@maharashtracity

५ वर्षात कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर ९ कोटींची उधळपट्टी

एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी ७२८ रुपयांचा खर्च

२०१४ मध्ये कुत्र्यांची संख्या ९५,१७२

सध्या कुत्र्यांची संख्या अंदाजे २,६४,६१९

२०१४ पासून आतापर्यंत १,२२,६४७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण -: पालिकेचा दावा

मुंबई: मुंबई महापालिकेने सन २०१४ पासून आजपर्यंत अशासकीय संस्थांच्या (NGO) माध्यमातून १ लाख २२ हजार ६४७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. तसेच, गेल्या २०१७ ते २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत निर्बिजीकरणावर तब्बल ९ कोटींचा खर्च करल्याचा दावा पालिकेने केला आहे.

त्यानुसार गणित केल्यास पालिकेने एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर सरासरी ७२८ रुपये खर्च केल्याची बाब समोर येते. एवढा खर्च करूनही खर्च करूनही कुत्र्यांची संख्या, कुत्र्यांचा त्रास, कुत्र्यांनी चावा घेणे असे उपद्रवी प्रकार सुरूच आहेत.

मुंबईत पादचारी, सामान्य नागरिक, फेरीवाले, महिला, विद्यार्थी हे भटक्या कुत्र्यांच्या (street dogs) समस्येने बेजार झाले आहेत. या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने निर्बिजीकरण (sterilisation) मोहीम हाती घेतली.

धक्कादायक बाब म्हणजे पालिकेने २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२ होती. मात्र पालिकेने, कुत्र्यांचा मृत्यू दर, प्रजनन दर, निर्बिजीकरण संख्या आदी कारणांचा हवाला देत सध्या मुंबईतील कुत्र्यांची संख्या अंदाजे २ लाख ६४ हजार ६१९ वर गेली असल्याचे म्हटले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबतच्या ज्वलंत विषयाला शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ (Shiv Sena Corporator Sachin Padwal) यांनी, पालिका कायदा व नियम ६६ ( क) अनव्ये काही प्रश्न उपस्थित करून पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला होता.

भटक्या कुत्र्यांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिकेने भटक्या जनावरांप्रमाणे भटक्या कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवावे आणि त्या कुत्र्यांना प्राणी मित्रांना सांभाळण्यासाठी दत्तक तत्त्वावर द्यावे, अशी मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. हा ठराव मंजूर झाला आहे.

त्यावर पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी एका निवेदनाद्वारे वरीलप्रमाणे माहिती दिली.

या निवेदनातील माहितीनुसार पालिकेकडे भटक्या व उपद्रवी कुत्र्यांना पकडण्यासाठी सध्या ४ वाहने अधिक पालिका परिमंडळ निहाय प्रत्येकी एक याप्रमाणे अतिरिक्त ७ वाहने अशी एकूण ११ वाहने उपलब्ध आहेत.

तसेच, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ८ – कनिष्ठ अवेक्षक , ६ श्वान पारधी दुय्यम निरीक्षक व २४ श्वान पारधी अशी ३८ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. ६ अशासकीय संस्थांच्यामार्फत भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण करण्यात येते.

५ वर्षात निर्बीजीकरणावर झालेला ९ कोटींचा खर्च

२०१७ -: १,४०,४१,६०० रुपये

२०१८ -: २,७८,९२,८०० रुपये

२०१९ -: १,८६,१८,६०० रुपये

२०२० -: ३६,४३,२०० रुपये

२०२१ -: २,५१,९१,३०० रुपये

एकूण खर्च -: ८,९३,८७,५०० रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here