By विवेक भावसार

@vivekbhavsar

महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi – MVA) कोरोनाचे कारण दाखवत राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नाही तर मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीचे (BMC polls) बिगुल कधीही वाजू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज ‘सागर’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्ष नेत्यांची, आमदार, नगरसेवक यांची बैठक बोलावली आहे. मिशन मुंबई महापालिका हे अग्रक्रमावर असलेल्या भाजपचे तुलनेत जास्त आमदार आहेत. तरी गेल्या वेळी महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनेची (Shiv Sena) संख्या ही भाजपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महापालिका काबीज करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

महाराष्ट्रात 2014 ते 2019 या कालावधीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असे युतीचे (BJP – Shiv Sena Alliance) सरकार सत्तेत असूनही 2017 ची महापालिका निवडणुक दोघेही स्वतंत्रपणे लढले होते. निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळचे पक्षीय बलाबल असे होते – शिवसेना – 84, भाजप – 82, काँग्रेस – 31, राष्ट्रवादी काँग्रेस – 9, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 7, समाजवादी पार्टी – 6, एम आय एम – 2, अखिल भारतीय सेना – 1 आणि अपक्ष 5.

कालांतराने मनसेचे (MNS) 6 नगरसेवक शिवसेनेत गेले. काही अपक्ष सेनेकडे तर काही भाजपकडे गेले.

2017 च्या निकालाचे संख्या शास्त्र

काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरसेवक निवडून आले अशा प्रभागात भाजप आणि सेनेची काय स्थिती होती, याचा आढावा घेऊ.

या निकालात भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या तर 58 प्रभागात भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. साहजिकच भाजपला आता या 58 जागेवर लक्ष केंद्रित करतांनाच ज्या 10 प्रभागात भाजप तिसऱ्या क्रमांकावर होती, तिथेही लक्ष द्यावे लागेल.

कांदिवली (पश्चिम), मालाड (पश्चिम), जोगेश्वरी (पश्चिम), भांडुप (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), कुर्ला आणि माटुंगा या विधानसभा क्षेत्रांत येणाऱ्या ज्या 10 प्रभागात 2017 मध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर होती, त्यातील 5 जागा काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या होत्या, तर 2 अपक्ष निवडून आले होते.

या 10 पैकी 28 (आर दक्षिण), 83 (के पूर्व), 123 (एन वॉर्ड) आणि 176 (एफ वॉर्ड) हे चार प्रभाग भाजप आमदार योगेश सागर, भारती लव्हेकर, पराग शाह आणि कालिदास कोलंबकर यांच्या मतदारसंघात येतात. 2017 मध्ये या प्रभागातून काँग्रेसचे 3 आणि 1 अपक्ष सदस्य निवडून आले.

भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 10 पैकी 4 प्रभाग असे आहेत जिथे शिवसेना आमदार निवडून आलेले आहेत. हे प्रभाग विधानसभेच्या भांडुप पश्चिम आणि कुर्ला मतदारसंघात येतात आणि तिथे मंगेश कुडाळकर आणि रमेश कोरेगावकर नेतृत्व करतात.

भाजपच्या तुलनेत शिवसेनेची स्थिती

2017 चे निवडणूक निकाल बघितले तर भाजपच्या तुलनेत भाजपची चांगली होती असे दिसते. भाजप 58 जागी दुसऱ्या क्रमांकावर होती तर शिवसेना 89 प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर होती.

महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना विद्यमान जागा कायम राखण्यात यशस्वी होतील, असे गृहीत धरले तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जास्तीत जास्त किती जागेवर येत्या निवडणुकीत विजय मिळवता येईल त्यावर महापालिकेवर शिवसेना सत्ता राखण्यात यशासी होईल की भाजप सेनेकडून सत्ता हिरावून घेईल हे ठरणार आहे.

गेल्या वेळी 227 प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ सरळ लढत झाली होती. या सरळ लढतीत भाजपने 62 तर सेनेने 43 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच भाजपने एकूण जिंकलेल्या 82 जागेपैकी 62 जागा सेनेच्या विरोधात जिंकल्या होत्या.

अन्य सरळ लढती

34 प्रभागात भाजप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. त्यात भाजप 24 जागी तर काँग्रेस 10 वॉर्डात विजयी झाली होती. यातही वॉर्ड क्र 82 (के पूर्व) मध्ये भाजप केवळ 48 मतांनी पराभूत झाली होती. भाजपच्या आमदार भारती लव्हेकर यांच्या मतदारसंघात हा वॉर्ड येतो. पक्षाचा आमदार असतांना हा पराभव झाला होता.

Also Read: आमचं ठरलंय, ‘आदित्यच मुख्यमंत्री!’; असेही होऊ शकते?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढ्यात केवळ 5 वॉर्डात झाली होती. पैकी 3 वॉर्डात (111, 122 आणि 174) मध्ये भाजप विजयी झाली. तर 174 (एफ उत्तर) मध्ये 188 इतक्या कमी मताच्या फरकाने भाजपला विजय मिळाला होता. कालीदास कोळंबकर हे त्यावेळी काँग्रेस आमदार होते.

मनसेला आधीच्या 7 जागाही जिंकणे कठीण

मनसेने ज्या 7 जागा जिंकल्या होत्या, त्या प्रभागातील 3 जागी (क्र 126 – एन वॉर्ड, 133 – एन वॉर्ड आणि 166 – एल वॉर्ड) येथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. यातील पहिले दोन प्रभाग भाजप आमदार पराग शाह आणि तिसरा प्रभाग सेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यक्षेत्रात येतो.

मनसेने जिंकलेल्या 7 पैकी 156 (एल वॉर्ड), 189 (जी उत्तर) आणि 197 (जी दक्षिण) या प्रभागात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. हे प्रभाग सेना आमदार कुडाळकर, सेना आमदार सदा सरवणकर आणि आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतात.

ही राजकीय स्थिती बघितली तर राज ठाकरे यांच्या मनसेला या 7 जागी येत्या निवडणूकित पून्हा विजय मिळणे कठिण असू शकेल.

मनसे ज्या 12 वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती, त्यातील 11 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या तर एक जागा (162 एल वॉर्ड -कुर्ला) कॉंग्रेसने जिंकली होती.

मनसे दुसऱ्या स्थानावर असलेल्या 12 प्रभागापैकी 6 जागी भाजप तिसऱ्या क्रमांकावर तर 4 ठिकाणी भाजप चौथ्या क्रमांकावर होती.

याचा अर्थ मराठी मतांचे विभाजन झाले तरी या 12 जागा भाजपाच्या ताब्यात येण्याची शक्यता तशी कमी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here