@maharashtracity
धुळे: शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील तरुणांनी वर्षभरापूर्वी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करतानाच गावात घर तेथे वृक्ष लागवडीचा संकल्प केला.
स्वच्छ भारत मिशन (Swach Bharat Mission) ग्रामीण आणि नेहरू युवा केंद्र, धुळे (Nehru Yuva Kendra – NYK, Dhule) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आज अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छतेसाठी श्रमदानही करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत गाव परिसरात नव्याने वृक्षांची लागवडदेखील (tree plantation) करण्यात आली.
स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी असून गावाच्या सुदृढ आरोग्यासाठी घर आणि परिसर कायम स्वच्छ असला पाहिजे त्यासोबतच गावात प्लास्टिक बंदी करून प्लास्टिक मुक्त गावावर भर द्यावा असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद धुळे आणि नेहरू युवा केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भाटपुरा व मांजरोद येथे स्वच्छतेसाठी श्रमदान तसेच वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाटपुरा येथे जितेंद्र राठोड आणि अनिकेत बोरसे यांच्यासह परिसरातील तरुणांनी गेल्यावर्षी पाच हजारापेक्षा जास्त झाडे लावली होती. या झाडांचा वाढदिवस देखील आज साजरा करण्यात आला.
मौजे भाटपूरा व मांजरोद येथे प्रत्येकी एक हजार वृक्षारोपण संकल्प करून वृक्षारोपण कार्यक्रम शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार, नेहरू युवा केंद्र धुळे चे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, लेखाधिकारी नाना पाटील, विस्तार अधिकारी आर झेड मोरे ,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाटपुरा येथे शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचार्यांसह गावातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर गाव परिसरात नव्याने वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच गेल्या वर्षी जेथे वृक्षांची लागवड केली होती, तेथे भेट देऊन अधिकार्यांनी पाहणी केली तसेच समाधानही व्यक्त केले.