@maharashtracity

धुळे: शासनाने वाढ केलेल्या जीएसटी (GST) करात कपात करावी. हा कर पुर्ववत पाच टक्के इतका करावा, अशी मागणी कापड व्यापारी संघटनेने केली आहे. जीएसटी करात कपात न केल्यास दिनांक 1 जानेवारीपासून बेमूदत कापड व्यापार (cloth merchants Association) बंद करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

याबाबत धुळे (Dhule) क्लॉथ मर्चंट असोसिएशन या कापड व्यापारी संघटनेने उपजिल्हाधिकारी सुरेखा चवहाण यांना निवेदन दिले. यावेळी कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुशील खंडेलवाल, अनिल कटारिया, द्वारका अग्रवाल, करण अग्रवाल, गिरीष अग्रवाल, राजकुमार सदाने, प्रल्हाद मंदान, राजेंद्र तनेजा, दिनेश रेलन, प्रविण कटारिया, मनिष रेलन, आनंद श्रीमळ, सुनिल पंजाबी, मनोहर मंदान, दिनेश भंडारी, संतोष पिंगळे, कैलास वधवा, दीपक रुणवाल यांच्यासह कापड व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की गेल्या 50 वर्षापासुन कापडावर कर नव्हता. नंतर कपड्यांवर पाच टक्के जीएसटी कर लावण्यात आला. तो आम्ही व्यापार्‍यांनी स्विकारला. परंतू, आता केंद्र शासनाने जीएसटी करात वाढ करुन तो 12 टक्के केला. यामुळे कपड्यांच्या दरात 50, 100 ते 200 रूपयेप्रमाणे वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे लहान, मोठे व्यापारी, घाऊक, किरकोळ व्यापार्‍यांचे तसेच पर्यायाने थेट ग्राहकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यातून कापड व्यवसाय व व्यापारी अडचणीत येणार आहे. यामुळे शासनाने वाढविलेला 12 टक्के जीएसटी कर कमी करुन तो पुर्ववत म्हणजे पाच टक्के करावा, अशी व्यापार्‍यांची एकमेव मागणी आहे.

जर 1 जानेवारीपर्यंत करात कपात झाली नाही तर मुंबई येथील संघटनेतील पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन कापड व्यापार बेमुदत बंद करण्यात येईल, असे अध्यक्ष सुशील खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here