By विजय साखळकर
@maharashtracity
मस्तान मिर्झा (Mastan Mirza) वयाच्या अठराव्या वर्षी मुंबई (Mumbai) येथे दाखल झाला. कोचीन (Cochin) येथून तो मुंबईत आला. सागरी मार्गानं आला आणि मुसाफीरखान्यात राहीला. नाव कमावणं हा काही त्याचा हेतू नव्हता. पोट जाळणं, कसंही करुन आणि जमलं तर घरी पैसे पाठवायचे हा त्याचा हेतू होता.
अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी त्याचं मुंबईतील कुठल्या तरी भागात घर होतं आणि आई- वडिलांसोबत तो तिथं राहायचा, असा शोध लावला असला तरी प्रत्यक्षात त्यानं स्वत:च्या तोंडानं हे कधीच कबूल केलेलं नाही. मात्र, तो मुंबईत आल्यावर प्रथम मुसाफिरखान्यात पहिले तीन दिवस राहिल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यानंही ते वेळोवेळी सागितलं आहे. तीन दिवसानंतर मुसाफिरखान्यातील जागा सोडावी लागते. त्यानुसार त्यालाही जागा सोडावी लागली आणि तो मुसाफिरखान्याच्या रस्त्यावर राहू लागला.
दिवसभर मुंबई फिरायची आणि रात्री गल्ली शांत झाली की तिथल्या एका स्टाॅलवर ठेवलेली पथारी काढून झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उजाडण्याआधी उठून मुंबई फिरायला जायचं हा त्याचा उपक्रम होता. काम मिळेपर्यंत असंच करावं लागणार होतं.
नोकरी, काम शोधताना त्याची ओळख एका चिक्कीच्या होलसेल व्यापाऱ्याशी झाली. त्यानं त्याला उधारीवर चिक्की देण्याचं मान्य केलं. एक दिवसाची उधारी. सकाळी चिक्की न्यायची. दिवसभर संपवायची. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या चिक्कीचे पैसे चुकवायचे आणि नवी उधारी करायची, असा त्याचा व्यवसाय होता.
चिक्की घेऊन तो जितकं फिरता येईल तेवढं फिरायचा आणि त्याच्या मिठ्ठास बोलण्यानं त्याचा व्यवसाय वाढू लागला होता. दिवसभरात जमा होणारे पैसे साठविण्यासाठी त्यानं एक मडकं घेतलं होतं. त्या मडक्यात तो दिवसभराचा सगळा खर्च भागवून राहणारे पैसे ठेवू लागला. हे मडकं रात्री झोपताना उशाशी ठेवून झोपायचा. सकाळी उठला की मडकं आणि पथारी स्टाॅलवर टाकून तो चिक्की खरेदी आणि विक्री यात गुंतून जायचा.
मस्तान यानं घेतलेल्या मडक्यात पैसे वाढू लागले. त्याचबरोबर त्याचे मित्रही वाढू लागले. मस्तानचा स्वभाव वर्तन मिठ्ठास त्यामुळे भोवती मित्रांची गर्दी वाढत गेली. अनेकांनी त्याला मडक्यातील पैशाबाबत सावधगिरीचा इशारा दिला….. त्या त्या वेळी मस्तान सांगायचा.. मटके मे है, कोई छीन लेगा… जेब मे है, छीन लेगा… हातमेसे भी कोई उठाके ले जाएगा….. पर जो यहा लिखा है, (कपाळावर बोटं फिरवत) है बिशाद किसी की उठाकर भागनेकी…..?
मस्तान दिवसभराचा त्याचा जेवणाखाण्याचा खर्च आणि सिनेमाच्या तिकिटाचे पैसे सोडून उरलेले पैसे मडक्यात ठेवायचा…. त्या पैशातून तो मित्रांना उसने पैसे द्यायचा. पण त्याचा हिशोब ठेवत नसे. फसवेल कुणी अशी शंका त्याच्या मनात पेरू पाहणाऱ्यांना तो सांगायचा, जेबमेसे जाएगा, हाथसे जाएगा, नसीबमे लिखा है वो तो रहेगाही. पण त्याला कुणी फसवत नव्हतं.
सिनेमाचा त्याला नाद जडला. तो रोज एक सिनेमा पाहायचाच. बरोबर तिथल्या कुणाला तरी न्यायचा. त्यावेळी कुणाला कल्पनाही नव्हती की हा माणूस पुढच्या काळात सिनेमानिर्मात्यांना (film producer) फायनान्स (financer) करणारा आसामी बनणार आहे.
मस्तानची अशी लोकप्रियता वाढीस लागलेली असतानाच तो पैसे जोडण्यासाठीआणखी काही करता येईल का, याचाच विचार करीत असायचा. चिक्की घेणारी त्याची काही गिऱ्हाईके होती. त्यांनाही त्यानं आपल्याला कुठे तरी चिकटवून टाकण्याची गळ घातली होती.
अशा रीतीने मस्तानची पत मुसाफिर खाना परिसरात वाढत असतानाच एक अलौकिक घटना घडली. त्यामुळे मस्तानच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.
तो काळ दुसऱ्या महायुध्दाचा (Second World war) होता. मुंबईवर युद्धाचे ढग सावली धरून उभे होते. रात्री मुंबई गाढ झोपली होती. मुसाफिरखान्याच्या रस्त्यावरील आपल्या नेहमीच्या जागी मस्तानही झोपला होता.
तो ज्यावेळी जागा झाला त्यावेळी त्याच्या उशाला असणारं मडकं उंच उडालं होतं आणि खाली पडतांना ते झेलायचं कसं याचा तो विचार करीत होता……. त्याचवेळी त्या रस्त्यावर आणि परिसरात जीवतोड पळापळ सुरू होती. माणसं धावत होती. खणकन आवाज झाला. मडकं खाली पडलं. फुटलं. मडक्याचे तुकडे तुकडे झाले. आतले पैसे नाणी जमिनीवर विखुरली. माणसांचा जोरदार लोंढा आला. मस्तान त्या लोंढ्याबरोबर वाहत गेला.
सन १९४४ साली मुंबईच्या गोदीत (dock) झालेला हा स्फोट. त्या स्फोटात अर्धी कमी मुंबई ढासळली होती. मस्तानही ढासळला होता. त्याची साठलेली पुंजी हरवली होती. खिसा रिकामा झाला होता. दोस्त हरवले होते.
तो पुन्हा एकदा केरळमधून (Kerala) मुंबईत थडकल्यागत झाला होता.
(पुढील अंकी : गोदी का चूहा)
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)