@maharashtracity

अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी शेतकर्‍यांची निदर्शने

धुळे: वीज वितरण कंपनीच्या सोनगीर शाखेने धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील चारही रोहित्रांचा वीज पुरवठा कोणतीही पुर्वसूचना न देता बंद केल्याने फळ भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका दीडशेहून अधिक शेतकर्‍यांना बसला. (Power supply of transformer disconnected without prior intimation)

परिणामी, देवभाने शिवारातील दीडशेहून अधिक शेतकरी थेट ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करुन, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केलीत. (Farmers protest)

शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवभाने शिवारातील चार विद्युत रोहित्रांचा वीजपुरवठा संबंधीत अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना कोणतीही पुर्व सूचना न देता 23 ऑक्टोबर रोजी खंडित केला. परिणामी दीडशेहून अधिक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यात कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी, कांदा बियाणे, वांगे, भेंडी, टामाटा, मिरची, कारले, गिलके, फ्लॉवर आदीसह सर्व पाले भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Crop loss due to power disconnection)

अचानक वीज पुरवठा खंडित केल्यामुळे सर्व प्रकारचे पिके करपून गेली आहे. यापूर्वी वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या आवाहनानुसार सर्व शेतकर्‍यांनी वेळोवेळी वीज बिले भरलेली आहे. मात्र सध्या अवकाळी व अति पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला, हंगाम वाया गेला.

तरी देखील शेतकरी वर्गाने नव्या जोमाने रब्बी हंगामावर (Rabbi season) आशा ठेवून विविध पिकांची व विविध बियांची लागवड केली. शेतात पिकांना अंकुर फुटत असताना किंवा काही पिके बहरू लागत असतानाच वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी देवभाने शिवारातील शेतकर्‍यांना कोणतीही पूर्व सूचना न देता चार विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित केला.

गेल्या साडेतीन महिन्यात सात वेळा विद्युत रोहित्र जळून खराब झाले. त्या सातही वेळा सर्व शेतकर्‍यांनी पैसे जमा करून विद्युत रोहित्र बसवली. याच काळात एकदा 23 हजार रुपये किमतीची केबल वायर जळून खाक झाली. तो खर्चही शेतकर्‍यांनी केला.

असे असताना वीज कंपनीने अचानक वीज पुरवठा खंडीत केल्याने पीके करपून नुकसान झाले. यामुळे देवभाने परिसरातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहेे.

वीज पुरवठा सुरळीत करुन शेतकर्‍याना न्याय द्यावा आणि संबंधीत अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भागवत माळी, विजय माळी, अभिमन्यू माळी,जगदीश माळी, दिनेश माळी, आत्माराम माळी, डोंगर माळी, आनंदा माळी, संतोष माळी, विश्‍वनाथ चौधरी, सुरेश माळी, भावराव माळी, बाबुलाल माळी यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here