@maharashtracity

धुळे: देशात गेल्या दोन वर्षापासून सैन्य भरती बंद आहे. ही सैन्य भरती तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी मंगळवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

तसेच सैन्य भरती न झाल्यास वंचित बहूजन युवा आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्‍वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत संसदेला घेराव (Gherao to Parliament) घालण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे (VBA) जिल्हाध्यक्ष भैय्या पारेराव, युवा अध्यक्ष योगेश जगताप, योगेश धात्रक, धनंजय वाघ, पवन सोनवणे, केतन पानपाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याबाबत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना सैन्य भरतीसाठी निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की, सैन्यात दाखल होण्याची इच्छा असणार्‍या हजारो तरुणांनी काही वर्षांपासून पोलिस, सैन्य भरतीची (Recruitment in military) तयारी सुरु केली आहे. मात्र केंद्र सरकारने दोन वर्षापासून सैन्य भरती बंद केली आहे. त्यामुळे तरुण हवालदिल झाले आहेत.

अनेक तरूणांचे वय वाढत होत आहे. काही तरुणांची वयोमर्यादा संपत आहे. यामुळे देशातील सैन्य भरती त्वरीत सुरू करावी. तसेच सैन्य भरतीची वयोमर्यादा पाच वर्ष वाढविण्यात यावी. निमलष्करी दलात एक लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढली आहे. ती जाहिरात पूर्ण पदांसाठी काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here