@maharashtracity

धुळे,जिल्ह्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४२० शाळा सुरू (reopening of school) होणार आहे.शाळेत जास्त विद्यार्थी असतील तर शाळा दोन सत्रात भरवावी आणि प्रत्येक शाळेत वैद्यकीय मदत कक्ष (medical help center) स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे (third wave of covid) शाळा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याने जुलै महिन्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले नव्हते. मात्र, तिसऱ्या लाटेत रूग्ण संख्या अचानक वाढण्यास सुरुवात झाल्याने १० जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यानंतर दहा दिवसांत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

नव्या निर्णयानुसार सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Dhule ZP CEO) वान्मथी सी. यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले व प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला.

बैठकीनंतर शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील चारही गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची ऑनलाइन बैठक घेत त्यांना शाळा सूरू करण्याची सूचना केली. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यावर संभाव्य स्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने अन्य वर्ग सुरू होऊ शकतील. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न न करता स्वच्छेने शाळेत बोलवावे, असे स्पष्ट करण्यात आले.

धुळे जिल्ह्यात नववी ते दहावीच्या ३६४ शाळा आहेत तर खासगी अनुदानित (granted school) ३३८ आणि विना अनुदानित २६ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये जवळपास ८५ हजार ३१० विद्यार्थी आहेत.

अकरावी आणि बारावीचे १५६ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमध्ये ५५ हजार २१२ विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात पाच हजार ५८७ शिक्षक व ६३२ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. नववी ते बारावीच्या शाळांना कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा व कोरोनाच्या संभाव्य स्थितीचे आकलन करून आठवडाभरानंतर उर्वरित वर्ग भरवण्याची रूपरेषा ठरविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here