@maharashtracity

By विजय साखळकर

मस्तान आणि युसूफ पटेल यांची दोस्ती होती ती पुढे व्यावसायिक भागिदारीत बदलल्याचे म्हटले जाते. युसूफ आणि मस्तान यांची ओळख झाली तेव्हा युसूफ कामाचा असल्याचे त्याला कळाले. कारण त्याची चांदीचं डिलिंग करणाऱ्यांशी जवळची दोस्ती होती.

त्या काळात चांदी ही विनिमय म्हणून वारली जात असे. म्हणजे सोन्याची जी किंमत असेल त्या किंमतीची भारंभार चांदी ही सोनं हाती घेताना जहाजात दिली जाई. अर्थात अन्य व्यवहारात मालाइतकी भारंभार किमतीचे खाद्यपदार्थ किंवा रोकड किंवा अन्य मौल्यवान वस्तू. केवळ मस्तानसाठी क्रेडिट होतं. मागील डिलिव्हरीचा मोबदला पुढची डिलिव्हरी ताब्यात देताना घ्यायचा. म्हणजे एक अख्खी डिलिव्हरी क्रेडिटवर.

युसूफचा (Yusuf Patel) चांदीचा छोटा व्यवसाय होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी, रोजचे भाव यांचं उत्तम निरीक्षण त्यखच्याकडे होतं. त्यामुळे मस्ताननं (Haji Mastan) चांदी विकत घेऊन पुरवण्याची जबाबदारी युसूफवर सोपवली. तस्करी (Smuggling) व्यवसाय मस्तानचा असला तरी तो मुख्य प्रवर्तक असे. कारण हे व्ववसाय कागदी दस्तऐवजांवर चालत नाहीत. मौखिक अटींवर चालतात.

Also Read: मस्तानचा पैसा आणि ‘सोना’ची चित्रपट कारकिर्द

उदाहरणार्थ…. मच्छीमारी व्यवसायात ट्राॅलर एकाच्या नावावर असतो. तो चालविणारा नाखवा वेगळा असतो. ट्राॅलरमधले जाळी टाकणारे, ओढणारे वेगळे असतात. तो माल उतरवून विकायला पाठवणारे वेगळे असतात आणि प्रत्येक फेरीला मिळणारा माल हा ठराविक टक्क्यानं दिला जातो. म्हणजे एका फेरीत मिळालेल्या मासळीचे तीन भाग केले जातात. ते समान असतात. त्या तीन समान भागांपैकी एक भाग ट्राॅलरमालकाचा, एक भाग माच्छी किंवा तांडेल, अर्थात ट्राॅलर चालविणा-याचा, तिसरा भाग ट्राॅलरवर जितके म्हणून खलाशी अथवा कामगार, मजूर असतील त्या साऱ्यांचा असे. तस्करीतही हाच समसमान वाटपाचा नियम कसोशीने पाळला जात असे.

मात्र, तस्करीत असे तीन समसमान वाटे असा शिरस्ता नव्हता.

पण डिपार्टमेंट कितीही असली तरी त्याचं बारीक लक्ष असायचं. एकदा लक्षात आलं की चांदीची पार्सल बांधताना युसूफनं काही घोळ केलाय. मस्ताननं त्याला बोलवून सर्व हकिकत कथन केली आणि यापुढे असे होणार नाही असे बजावले. पण पुढच्याही वेळी ‘चांदीच्या गोळ्यांचे शेणगोळे झाले. मस्तानकडून असा व्यवहार कधीच होत नव्हता शिवाय तो वैयक्तिकरीत्या असल्या चाळ्यांना थारा देत नसे. म्हणून त्यानं युसूफवर पाळत ठेवली.

याच दरम्यान मस्तानच्या अख्ख्या कंपनीत मनभेद झाले. मस्ताननं चांदी पुरविण्याचं काम युसूफकडून परस्पर काढून घेतलं आणि दुसऱ्या कुणाकडे तरी फिरवलं. याचा युसूफला राग आला. त्याच दरम्यानं पाचगणीहून (Panxhgani) येणाऱ्या युसूफ समर्थकांची गाडी फोडली. मस्तानच्या सिंडिकेटमध्ये उघड उघ‌ड फूट पडून दोन गट तयार झाले. एक गट मस्तानशी इमान राखणारा तर दुसरा युसूफचा पाठिराखा. युसूफचे पाठिराख्यांवर चुन चुन के हल्ले होत होते.

याच दरम्यान मस्तानच्या मागे कस्टमचा (custom) ससेमिरा लागला. त्याला अटक झाली. जामीनावर तो सुटला. पण परदेशात जाण्याआधी त्यांनं जबरदस्त खिचडी शिजवली होती. पुढे युसूफ हाच पोलीस आणि कस्टमला खबरा देत असावा अशी शंका मस्तान समर्थकांना आली.

बाॅम्बे गॅरेजमध्ये एक गुप्त बैठक घेण्यात आली आणि त्यात युसूफला धडा शिकवण्याचं ठरलं. या गुप्त बैठकीला कमलकिशोर उर्फ रामसुभाई छेडा, नासीर उद्दीन उर्फ बाबाजी अश्रफूर रैहमान उर्फ लालू, अहमदखान उर्फ मासू महंमद, अब्दुल रशीद उर्फ रशीद अब्रा, अब्दुल मजीद उर्फ मजीद कालिया यांचा या गुप्त बैठकीत समावेश होता.

त्यानंतर १९ नोव्हेंबर १९६९ रोजी रात्री डोंगरीत युसूफवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याची माहिती याआधी याच स्तंभातून देण्यात आली होती. गोळी युसूफच्या खांद्याला चाटून गेली. या हल्ल्यासाठी करीमलालानं हल्लेखोर पुरविले होते. त्यापैकी एकाला तिथे जमावानं पाठलाग करून पकडलं तर दुसरा पुण्यात पळून गेला.

त्याला तरटे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात जाऊन काढण्या लावल्या. मस्तान त्या काळात परदेशात गेला होता. मायदेशी येताच त्याला अटक झाली. पुढे या केसचा विचका झाला. उस्मान दूधवाला यानं एक मारेकरी ओळखला. पण केसमधली हवा गेली.

असं म्हटलं जातं की युसूफ भरलेलं रिव्हाॅल्वर घेऊन मस्तानच्या घरी गेला आणि त्यानं त्याला सुनावलं, भांडण तुझं-माझं आहे. मग त्यात बाकीच्यांना कशाला ओढतोस. हे रिव्हाॅल्वर घे आणि रिकामं कर माझ्यावर…

त्यानंतर त्या दोघांमधील वाद मिटला. पण तो काही अटी शर्तींवर…. दोघांनीही स्वत:चे धंदे स्वतंत्रपणे सांभाळावे. भागिदारी नाही. दोघांनीही एकमेकांच्या खबरा पोलीसांना, कस्टमला आणि प्रतिस्पर्ध्यांना द्यायच्या नाहीत.

हा वाद इथंच संपला.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुहेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here