@maharashtracity

इच्छूकांची मोर्चेबांधणी, विरोधकही प्रयत्नशील

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (DMC) दुसर्‍या सत्रातील महापौर पदासाठी निवडणुक (Election for Mayoral post) कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी महापौर पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणूकीत बंडखोरीसह (Rebel) फुटीचे ग्रहण लागू नये, याकरीता भाजपमध्ये (BJP) अतिशय सावधपणे पाऊले टाकली जात आहे.

तर महाविकास आघाडीतील (MVA) काही मातब्बर नेते चमत्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे. परिणामी, ही महापौर निवडणुक चुरशीची होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

महापालिकेच्या प्रथम सत्रातील महापौरांची अडिच वर्षाची मुदत दि. ३० जून रोजी संपली होती. पुढच्या अडिच वर्षांसाठी महापौर निवडला जाणार आहे. महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम १९ (१) च्या तरतुदीला अनुसरुन तसेच नाशिक विभागाचे आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिकेची महासभा घेण्यात येईल.

महानगर पालिका सदस्यांची विशेष बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या स्व.भारतरत्न डॉ.अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. महापौर निवडीच्या कार्यक्रमानुसार ११ सप्टेंबर ते सप्टेंबर १३ या काळात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात महापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र घेता येईल. म्हणजेच महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज घेेता येईल.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेची असेल. नगरसचिव हे पत्र स्वीकारतील. उमेदवारी अर्जांची छाननी दि. १७ रोजी सभेचे कामकाज सुरु असताना होईल. छाननी नंतर पंधरा मिनिटांचा कालावधी माघारीसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास महापौर पदासाठी निवडणुक होईल.

अशा प्रकारे महापौर निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. महापौर पदासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, वालीबेन मंडोरे, देवा सोनार या इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सूक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here