@maharashtracity

गणेशोत्सवात दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या अगोदर पदाधिकारी धावणार मदतीला

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणेशोत्सवावर (Ganesh Festival) सरकारी आदेशाने काही निर्बंध आले आहेत. मात्र गणेशोत्सवात काही अप्रिय दुर्घटना घडू नये आणि जर एखादी दुर्घटना घडल्यास व आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास अग्निशमन दलाची वाट न पाहता गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेच प्राथमिक मदतीला धावून येतील.

त्यासाठी पालिका आपत्कालीन व्यवस्थापन (Disaster Management) विभागामार्फत गणेशोत्सव मंडळांच्या १५० पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खास आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यंदाच्‍या गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी महापालिका प्रशासनाकडे, गणेशोत्सव मंडळांनाआपत्कालीन प्रशिक्षण देण्‍याबाबत विनंती केली होती.

त्‍यानुसार, पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत ४ आणि ५ सप्‍टेंबर रोजी दोन दिवसात शहर विभागातील मंडळांना परळ स्थिती शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात तर पूर्व उपनगरातील मंडळांना घाटकोपर भटवाडी महापालिका शाळा येथे आणि पश्चिम उपनगरातील मंडळांकरिता जोगेश्वरी (पूर्व) मधील नटवरनगर महापालिका शाळेत कोरोना नियमांचे पालन करून आणि प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन १५० पदाधिकारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास, त्या आपत्तीचे त्वरित निराकरण करता यावे, हा या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आपत्ती म्हणजे नेमके काय, धोके कसे ओळखावेत, आपत्‍कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये, आग लागल्यास त्वरित करावयाच्या उपाययोजना, अग्निशमकांचा वापर, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती याबाबतचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये देण्यात आले.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या आदेशाने, उपायुक्त प्रभात रहांगदळे, संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सत्रप्रमुख राजेंद्र लोखंडे, प्रवीण ब्रम्हदंडे, महेंद खंबाळेकर आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व १०८ आणीबाणी रुग्णसहाय्य सेवेचे अधिकारी आदींनी आपत्कालीन प्रशिक्षण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here