@maharashtracity

मागासवर्गीयांवरील अत्याचाराबाबत कडक धोरण अवलंबावा

राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना हजारो ईमेल

मुंबई: महाराष्ट्रात शक्ती कायदा त्वरित अंमलात आणावा. तसेच मागासवर्गीयांवरील अत्याचाराविरोधात कठोर धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी एकता मिशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (Bhim Army demands to implement Shakti Act)

या मागणीसाठी भीम आर्मीसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ईमेल, ट्वीटर तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठवून मागणी केली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलाभगिनी व मुलींवर अमानुषपणे बलात्कार करून हत्या करण्याचे प्रकार सुरु आहेत. मुंबई, अमरावती, पुणे आणि आता डोंबिविलीसारखी शहरेदेखील यातून सुटलेली नाहीत.

शिवाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा विटंबनेसारखा (Vandalization of statue of Dr Babasaheb Ambedkar) प्रकार बीड जिल्हा अंबेजोगाई येथील बर्दापूर या ठिकाणी घडला.

संबंधित ग्रामपंचायतीने ठराव देऊनसुद्धा त्या ठिकाणी दुसरा पूर्णाकृती पुतळा अद्याप उभा झालेला नाही. चाळीसगाव तालुक्यातील जामदा गावात समाजकल्याण केंद्रासमोरील अनधिकृत धंदे बंद करावे म्हणून तक्रार केली व बौद्ध उपसरपंच झाला म्हणून या गावातील शंभरावर लोकांनी बौद्ध वस्तीवर हल्ला केला.

अशाच घटना वरचेवर घडत आहेत. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती सक्षम आहे, तसेच अत्याचारित लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही हेच यातून सिद्ध होत आहे. अशी नाराजी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

साकीनाका महिला अत्याचार प्रकरणात नियुक्त सरकारी वकील (राजा ठाकरे) बदलून नितीन सातपुते यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पीडितेच्या आईने व भीम आर्मीने तसेच विविध संघटनांनी आपल्याकडे केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणून आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही.

गोरेगाव पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत मार्च २०२१ मध्ये दाखल ३७६ च्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द करून देखील सहा महिन्यात स्थानिक पोलिसानी आरोपीला पकडले नाही. आरोपी स्वतः शरण आला. या आरोपीविरुद्ध ऍट्रॉसिटी लावण्यास पोलिसांची टाळाटाळ सुरु असून यात पोलिसांची एकंदरीत भूमिका संशयास्पद आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरणदेखील सुन्न करणारे आहे. या प्रकरणात काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी राजकीय दबाव येत असला तरी कोणालाही माफ न करता सर्वांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने तसेच विविध संघटनांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ईमेल पाठवून केली आहे.

एकंदरीत या सर्व प्रकारांवरून पोलिसांची प्रतिमा मालिन झालेली असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरणी प्रलंबित शक्ती कायद्याची राज्यात त्वरित अंमलबजावणी करावी, महिला आयोग तसेच मागासवर्ग आयोगावरील नियुक्त्या विनाविलंब करण्यात याव्यात, महिला तसेच मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार या विषयावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करून ठोस निर्णय घेण्यात यावेत, मागासवर्गीयांच्या सर्वच योजना अंमलबजावणी प्रचार प्रसार व नियोजनासाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने महाराष्ट्र भरातून हजारो ईमेल पाठवून तसेच ट्वीटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here