@maharashtracity

राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) रस्ते दुरुस्ती कामावर १८०० कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याचा मनस्ताप वाहन चालक आणि पादचाऱ्यांना भोगावा लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आवाज उठवणार आहे.

‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर दरवर्षी खड्ड्यांची रांगोळी पडते. यंदाही हा खड्डे मनस्ताप मुंबईकरांच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे दिसतो आहे. तीन ते चार किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांची, प्रवाशांची तासनतास रखडपट्टी करतो आहे.

याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले (Adv Amol Matele) यांच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंते (रस्ते) राजन तळकर यांची भेट घेतली. तसेच खड्डे पडून चाळणी झालेल्या रस्त्यांवर मुंबईकरांचे कसे हाल होत आहेत, याकडे लक्ष वेधले. शहरातील उड्डाणपूल व रस्त्यांची कामेही कासगवतीने सुरू आहेत, याकडेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदनातून लक्ष वेधले.

सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी रुपये १८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबई शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांची रांगोळी का तयार झाली आहे, असा सवाल यावेळी अ‍ॅड. अमोल मातेले यांनी उपस्थित केला.

एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडले असताना वाहतूक कोंडीत वाहनचालक आणि मुंबईकरांची घुसमट होत आहे. दररोज नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीने मुंबईकर मानसिक तणावाखाली वावरत आहेत. रस्तोरस्ती पडलेल्या खड्ड्यांनी घेरला गेलेला मुंंबईकर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत असला तरी मुंबईकरांच्या सयंमाची परीक्षा मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधार्‍यांनी पाहू नये, असा इशाराचा राष्ट्रवादीतर्फे अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिला.

… तर मुंबईभर पाठपुराव्यासाठी एल्गार

गणेशोत्सवापूर्वी तरी मुंबईकरांना सुस्थितीतील रस्ते मिळावेत, रस्ते कामे जलदगतीने व्हावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंते (रस्ते) राजन तळकर यांच्याकडे केली.

रस्ते व उड्डाणपुलांच्या कामासाठी इतका मोठा निधी खर्चूनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात तरी कसे, यामध्ये कंत्राटदार आणि महापालिका अधिकार्‍यांची भ्रष्ट युती आणि भेसळखोर कारभार असल्याचे स्पष्ट दिसून येते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केला.

ही भेसळखोरी थांबवून मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते आणि उड्डाणपुलाची कामे जलदगतीने कशी होतील, यावर मुंबई महापालिका प्रशासनाने भर द्यावा. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एक आठवड्यात धोरण ठरवून कामाची अमलबजावणी व्हावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईभर पाठपुरावा आंदोलन’ करून प्रशासन आणि सत्ताधार्‍यांच्या कारभाराची चीरफाड करण्याचे धोरण अवलंबण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here