@masole_santosh

बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र वाटप भोवले

धुळे: अखेर बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (fake corona vaccination certificate) वाटप प्रकरणात पोलिसांनी धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Municipal Corporation) मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांसह चौघांना अटक केली. यात एक डॉक्टर, एक परिचारक व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या चौघांच्या अटकेमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता धुळे पोलिसांनी (Dhule Police) वर्तविली आहे.

महानगरपालिकेच्या (DMC) हद्दीतील एका शाळेत लसीकरण केंद्र (vaccination Center) दाखवून एका दिवसात तब्बल एक हजार 400 बनावट कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने (Shiv Sena) केला होता. यातून पुढे चौकशीत तीन हजार 191 बोगस लसीकरणचे प्रमाणपत्र वाटप झाल्याचे समोर आले. यात सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हवालदार सतिष कोठावदे, राहुल सोनवणे यांनी सुरू केली. याच बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र वाटप प्रकरणी पोलिसांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे (Dr Mahesh More) यांच्यासह डॉक्टर प्रशांत पाटील, परिचारक उमेश पाटील, कंत्राटी कर्मचारी अमोल पाथरे या चौघांना अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने या बोगस लसीकरण संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. सत्ताधारी भाजप (BJP) पक्षाच्या नगरसेवकांनीही खऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा दबाव आल्यानंतर महानगरपालिकेने या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.

Previous articleमेट्रो, पूल, इमारत बांधकामासाठी ३५५ झाडांची होणार कत्तल
Next articleभाजपच्या विरोधाला न जुमानता ३९ कोटींच्या टॅब खरेदीला मंजुरी
Santosh Masole
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here