@maharashtracity

सांगली: जुलै महिन्यात सांगली (Sangli) जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे (corona) आणि पूरस्थितीचे संकट असले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती जबाबदारी पार पाडू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भिलवडी, ता- पलूस येथे आले होते.

मुख्यमंत्री भिलवडी येथे बोलताना म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. शेती, घरेदारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू असून काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली तयारी हवी.

नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली निवेदने द्या त्यांतील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी पूरग्रस्तांना दिली.

भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अंकलखोपच्या दिशेने रवाना झाला. येथेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पूरग्रसतांशी अत्मियतेने संवाद साधत शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here