@maharashtracity

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र- उपकेंद्राची सोय

मुंबई: कोविड संसर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असे नियोजन राज्यात पहिल्यांदाच होत आहे. कोविड (covid) संसर्ग घटत असल्याने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्याच्या सोयीसाठी शाळा तेथे केंद्र तसेच उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची तसेच उपकेंद्रांची संख्या ९६१३ एवढी आहे. तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची तसेच उपकेंद्रांची संख्या २१३४९ इतकी असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

विद्यार्थ्याच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन गायकवाड यानी केले.
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यात सुरूवातीला ऑनलाईन पद्धतीने तर ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले.

प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी २९४३ होती. आता मात्र शाळा तेथे केंद्र तसेच उपकेंद्र असे नियोजन केल्याने बारावीसाठी परीक्षा केंद्रांची तसेच उपकेंद्रांची संख्या ९६१३ इतकी असणार असल्याचे सांगण्यात आले. तर दहावीसाठी मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या ५०४२ होती. आता शाळा तेथे केंद्र तसेच उपकेंद्र या पद्धतीने परीक्षा केंद्रांची व उपकेंद्रांची संख्या २१३४९ इतकी राहणार आहे.

परीक्षेच्या नियोजनात बदल झाल्याने बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी अतिरिक्त परीक्षा उपकेंद्रांची संख्या २२९६९ इतकी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्याची सोय लक्षात घेऊन १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीसाठी किमान ४० टक्के प्रात्याक्षिकावर आधारित प्रात्याक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग आणि गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here