@maharashtracity

मुंबई: युरोप (Europe), अमेरिकेतील (USA) कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC) अधिक सतर्क झाली आहे. पालिकेच्या विविध रुग्णालये, जंबो कोविड सेंटर आदी ठिकाणी खाटांची संख्या, कोविड उपचार केंद्राची व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविण्यात येणार आहे. पालिका आरोग्य यंत्रणा २४ तास अधिक सुसज्ज ठेवण्यात येणार असून कोविड चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे.

तसेच, महापालिकेच्या ७ परिमंडळे आणि २४ विभाग कार्यालयांशी संबंधित अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आणि पालिकेच्या पूर्वतयारीची अंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान उभारण्यात आलेली कोविड उपचार केंद्रातील यंत्रणा आवश्यक मनुष्यबळासह अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोविड विषयक वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय उपचारात ‘आरटीपीसीआर’ (RT – PCR) चाचणी व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ (Rapid antigen test) चाचणी या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच, आवश्यक ‘किट’ उपलब्ध करणे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविडबाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ (Contact tracing) केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा

प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत.

विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचा आढावा व प्रशिक्षण

कोविड विषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी व अधिक सुयोग्यप्रकारे करण्यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्बो कोविड रुग्णालये व कोविड उपचार केंद्रांबाबत

महापालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी असणा-या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबत देखील आढावा घेण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन

कोविड प्रतिबंधासाठी, सार्वजनिक ठिकाण मुखपट्टी वापरणे, २ व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर असणे, वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेची पूर्वतयारी

महापालिका क्षेत्रात सध्या वरळी (Worli) परिसरातील एनएससीआयमध्ये (NSCI Jumbo covid centre) उभारण्यात आलेले जम्बो कोविड रुग्णालय, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरातील जम्बो कोविड रुग्णालय, गोरेगांव परिसरातील नेस्को येथील जम्बो कोविड रुग्णालय, बृहन्मुंबई महापालिकेचे सेव्हन हिल्स रुग्णालय (Seven Hills Hospital), भायखळा व मुलुंड येथे रिचर्डसन ऍण्ड क्रुडास कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेले रुग्णालय, दहिसर जम्बो कोविड रुग्णालय, कांजुरमार्ग येथील कोविड उपचार केंद्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध रुग्णालयांसह शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

तसेच, महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये, ३० हजार ३६४ रुग्णशय्या (बेड) उपलब्ध आहेत. यामध्ये १७ हजार ६९७ ऑक्सिजन रुग्णशय्या, ३ हजार ७८८ अतिदक्षता रुग्णशय्या, लहान मुलांसाठी १ हजार ४६० रुग्णशय्या, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात २३० रुग्णशय्या आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात (NICU) ५३ रुग्णशय्या उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here