@maharashtracity

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर मुंबई महापालिकेने जवळजवळ यशस्वी मुकाबला केला. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आता तिसरी लाट येणार आहे. या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी डॉक्टर, नर्स यांची जवळजवळ २१०० पदे कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंत्राटी वरिष्ठ डॉक्टरांना डीएम – दरमहा २ लाख रुपये वेतन, एमडी – दरमहा १.५० लाख रुपये वेतन, सहाय्यक डॉक्टरांना एमबीबीएस – दरमहा ८० हजार रुपये, बीएएमएस – दरमहा ६० हजार रुपये तर बीएचएमएस – दरमहा ५० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच, नर्सला दरमहा ३० हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका कंत्राटी वरिष्ठ डॉक्टरांमध्ये, वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटोस्टीव्हिस्ट, अँनेस्थेटिस्ट, नेफ्रालॉजिस्ट, कार्डीओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्टक यांची ५० – ७० पदे, सहाय्यक डॉक्टरांची ९०० – १००० पदे आणि नर्सची ९००-१००० पदे अशी एकूण अंदाजे २१०० पदे भरण्यात येणार आहेत.

सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लवकरच कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने पालिकेने, दहिसर, बीकेसी, मुलुंड जंबो कोविड सेंटर बंद केले आहेत. सेव्हन हिल्स या पालिकेच्या रुग्णालयात कोरोना बधित रुग्णांची संख्या ५०% एवढीच आहे. अनेक कोविड सेंटरमध्ये ९०% बेड रिकामे आहेत.

तरीही खबरदारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सरकार, पालिका प्रशासन यांनी तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here