@maharashtracity

11 टक्के ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 89 टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्हचे रुग्ण

ओमिक्रॉनचे अद्याप 2च रुग्ण

जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा आजपर्यंतचा निष्कर्ष

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोविड विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (Genome Sequencing) करणाऱ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 11 टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 89 टक्के रुग्ण आढळले आहेत. तसेच, ओमिक्रोन (Omicron) या नवीन प्रकाराचे फक्त 2 रुग्ण आणि संकलित नमुन्यांच्या संख्येत 1 टक्क्यांपेक्षाही कमी आढळले आहेत.

चाचणीच्या पाचव्या तुकडीमध्ये मुंबईतील 221 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातील एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (NIV) अशा दोन्ही ठिकाणी पाचव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 277 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

यातील 221 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. मुंबईतील 221 रुग्णांपैकी 19 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 69 रुग्ण (31 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 73 रूग्ण (33 टक्के), 61 ते 80 वयोगटात 54 रुग्ण (25 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 6 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीच्या निष्कर्षावरून मुंबईतील कोविडची साथ आटोक्यात येत असल्याचे स्पष्ट होत असले तरी, नवीन ओमिक्रोन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे.

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण (vaccination) पूर्ण करुन घेणे देखील आवश्यक आहे असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani)यांनी सांगितले.

दरम्यान, चाचणीतील निष्कर्षानुसार, 221 पैकी 24 रुग्ण (11 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ (Delta variant) तर 195 रुग्ण (89 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे जण ओमिक्रोन या नवीन प्रकारच्या विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. या 221 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या 26 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या 47 पैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

सुदैवाने, या 221 पैकी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे. एकूण 221 रुग्णांपैकी, 13 जणांचे वय वय वर्ष 18 पेक्षा कमी आहे. पैकी 2 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ आणि 11 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here