@maharashtracity

‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या तक्रारीची पालिकेकडून दखल व कारवाई
१४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईनची गरज नाही

मुंबई: परदेशामधून मुंबईत एअरपोर्टवर (Mumbai Airport) उतरणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या (corona) नावाखाली पालिका अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या लुटालुटीला आणि मानसिक छळवणुकीला आता कायमस्वरूपी चाप बसणार आहे.

परदेशामधून आपल्या घरी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, काही कामकाजासाठी एअरपोर्टवर उतरणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या नावाखाली पालिका अधिकारी हे नियमबाह्यपद्धतीने १४ दिवस हॉटेलमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional quarantine) होण्यास भाग पाडतात. त्यामुळे या प्रवाशांना हॉटेलमधील हजारो रुपये खर्चाचा भुदंड बसतो.

तसेच, संस्थात्मक क्वारंटाईन न होण्यासाठी हजारो रुपयांची तोडपाणी करून प्रवाशांची लूट केली जाते, असे गंभीर आरोप करीत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी (BJP MP Gopal Shetty) यांनी आज थेट पालिका मुख्यलयात अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे तक्रार केली. तसेच, याप्रकरणी संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त वेलरासु यांनी, परदेशामधून येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR report) रिपोर्ट दाखविल्यास त्यांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत.

जे प्रवाशी मिडल ईस्ट (Middle East), युरोप (Europe) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) व अन्य देशातून बाहेरून मुंबईत येतील त्यांचे आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट तपासून व त्यांची कोरोना चाचणी करून त्यांना थेट घरी पाठविण्यात यावे.

जर पुढे त्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास अथवा कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास तर त्यांना क्वारंटाईन करून पुढील वैद्यकीय उपचाराची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परदेशामधून मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्ट कारभारापासून व मानसिक जाचापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत मिडल ईस्ट, युरोप आणि दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर प्रमाणपत्र असल्यास त्यांनाही घरी सोडण्यात यावे. केवळ त्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांना घरीच होम क्वारंटाईन (Home Quarantine) करण्यास सांगण्यात येईल, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे.

खासदारांचा संताप का ?

रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून मध्यरात्री २ वाजता आलेल्या शिगवण या मुलाला १४ दिवस हॉटेलमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले. पण त्याने खर्च परवडणार नसल्याने नकार दिल्याने १० हजार रुपये दे असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले व मग घरी जाण्यास सांगितले.

त्याचवेळी, पहाटेच्या सुमारास एअरपोर्टवर पोहचलेले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना हा गंभीर प्रकार समजताच त्यांनी त्यावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला. त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या एका परिपत्रकाचा हवाला दिल्यानंतर त्या मुलाला सोडण्यात आले.

विमानतळावर आलेला हा भयंकर व गंभीर अनुभव पाहता कोरोनाच्या नावाखाली प्रवाशांची छळवणूक, पिळवणूक व लुबाडणूक होत असल्याचे समोर आल्याने खा. शेट्टी यांनी याप्रकरणी पालिकेकडे थेट तक्रार केली.

खा.गोपाळ शेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त वेलरासु यांची भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक विनोद मिश्रा, कमलेश यादव, माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांच्यासह भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व चर्चा केली.

त्यावर वरीलप्रमाणे कार्यवाही झाल्याने खा. गोपाळ शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here