Twitter : @ManeMilind70

महाड

महाडमधील शिरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या सेंट झेवियर्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मागील नऊ वर्षापासून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या शाळेच्या चेअरमनसह मुख्याध्यापक व दोन शिक्षकांविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सेंट झेवियर्स शाळेत सौ शरयू राजदीप वनारसे, राहणार महाड यांचा मुलगा सन 2015 पासून आजतागायत शिक्षण घेत होता. या नऊ वर्षाच्या कालावधीत शिक्षण घेत असताना तो वारंवार आजारी पडत असल्या कारणाने तो शाळेत गैरहजर राहत होता. याचाच राग ठेवून शाळेतील शिक्षक अमित अंधेरे आणि सोनाली शिंदे हे या विद्यार्थ्यास वारंवार अन्य विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देत, तसेच अनेक वेळा विद्यार्थ्यांसमोर मारहाण देखील करीत असे.

शिक्षक वारंवार मारहाण करीत असल्याने अखेर त्या विद्यार्थ्याने हा प्रकार पालकांना सांगितला. त्याच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांना जाब विचारण्याऐवजी शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा व चेअरमन डिसोजा यांनी विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक अपमानस्पद वागणूक दिली, असा आरोप श्री वनारसे यांनी केली.

या प्रकाराबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार दाखल होत नसल्याने वनारसे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पनवेल येथील बालकल्याण विभागाकडे याबाबतची सदरची तक्रार पाठवली.

पनवेल येथील बालकल्याण विभागात याबाबतची सुनावणी सुरू असतानाच महाड शहर पोलिसांनी तक्रारदार वनारसे यांना बोलावून महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली. सेंट झेवियर्स शाळेचे शिक्षक अमित अंधेरे व सोनाली शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डिसोजा व याच शाळेचे चेअरमन डिसोजा यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 323, 504 ,506, 34 व बाल हक्क संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 82 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काजरोळकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here