By विजय साखळकर

@maharashtracity

मुंबई अंडरवर्ल्ड (Mumbai Underworld) आणि तेथील श्रैष्ठता प्राप्त करण्यासाठी झालेल्या गॅंगवाॅरच्या (Gangwar) आधी मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे (Manya Surve) हा टेरर ठरला होता. १९८२ मध्ये मन्या सुर्वे पोलीस चकमकीत (police encounter ) मारला गेला. पण त्याआधी त्यानं मुंबईत हॅवाॅक माजवला होता.

अवघ्या पाच – सहा वर्षाच्या काळात त्यानं ज्या – ज्या युक्त्या केल्या त्या – त्या पुढे अंडरवर्ल्डमधील वेगवेगळ्या टोळ्यांतील धुरीणांनी बजावल्या. मग त्या तुरुंगातून पळण्यापासून ते पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला आपली ताकद दाखवून देण्याच्या घटनांचा समावेश आहे. अमर नाईक (Amar Naik) वेषांतर करण्यात मशहूर होता. पण मन्या सुर्वे खंडणीवसुलीसाठी (extortion) वेषांतर करून जात असल्याचा इतिहास आहे.

मन्या सुर्वे हा अंडरवर्ल्डमधील पहिला सदस्य ज्याने काॅलेजची दोन वर्षेपूर्ण केली व तीही विज्ञान शाखेतून असं म्हटलं जातं. त्याला तरुण वयातच रहस्यकथा (thriller stories) वाचण्याचा छंद होता. जेम्स हॅडले चेस (James Hadley Chase) हा त्याचा आवडता लेखक होता. त्याच्या प्लाॅटवरून तो आपली कारस्थानं चालवायचा असेही एका पत्रकारानं म्हटलं होतं. पण ते तेवढंसं खरं वाटत नाही. कारण चेसच्या पुस्तकातील प्लाॅटस वापरण्याइतकी मुंबईतील गुन्हेगारी त्याच्या काळात पुढे गेली नव्हती. तो वाचनाचा आनंद लुटण्यासाठी चेसवर विसंबून असेल.

मन्याचा भाऊ भार्गव हा तसा नामचीन दादा होता. तो एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात होता व त्या काळात मन्या तयार होत होता. प्रभादेवीला (Prabhadevi) तो राहायचा आणि सहसा घरी भेटत नसायचा.

मन्याची गॅंग आटोपशीर होती. भरताड सदस्य त्याच्या गॅंगमध्ये नव्हते. त्या काळात दूध सेंटर्स (Milk centres) लुटणं हा अंडरवर्ल्ड टोळ्यांचा व्यवसाय होता. पण त्याही काळात मन्या सुर्वे आढ्यता मिरवायचा, “आपण लाखाच्या खालच्या रकमेला हातही लावत नाही.” मुंबईतील भाई लोक जेव्हा दहा-वीस हजाराची खंडणी वसूल करीत त्या काळात मन्या लाखा-लाखाची खंडणी मागत असे आणि ती मिळाली नाही तर तो कोणत्याही थराला जात असे.

मन्या हा मुंबई पोलिसाशी झालेल्या चकमकीत १९८२च्या पहिल्या तिमाहीत मारला गेला. मुंबई पोलिसांच्या इतिहासात ही पहिली चकमक म्हणून ओळखली जाते. त्याची चकमकही वादग्रस्त ठरली. मुंबईच्या वडाळा परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेजच्यासमोर (Dr Babasaheb Ambedkar college, Wadala) ही चकमक झाली. पण काही वृत्तपत्रांनी या चकमकीविषयी शंका प्रदर्शित केली होती.

मन्याला पनवेल (Panvel) येथे पकडले गेले व वडाळा येथे आणून त्याला सोडले व तो जात असताना त्याला ‘मन्या’ अशी हाक मारण्यात आली व मागे वळून पाहताच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असा या बातम्यांतील मतितार्थ होता. त्यावेळी ज्यलिओ रिबेरो (Mumbai CP Julio Rebeiro) हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते तर रणवीर लेखा हे गुन्हे विभागाचे सहआयुक्त होते.

मन्या सुर्वेचं आयुष्य इतकं थरारक होतं की सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्याच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट काढण्याचा मोह एका निर्मात्याला झाला. पण या चित्रपटानं फार मोठा पल्ला गाठला नाही. कारण त्यात मन्याचा इतिहास कमी होता आणि सिनेमातला मसाला जास्त होता.

मनोहर अर्जुन सुर्वे ही त्याच्या काळात अख्यायिकाच ठरली होती. तो धावण्यात पटाईत होता. खंडणी वसूल करतेवेळी तो जी मागणी करायचा त्यात तडजोड नसे. त्याला तेवढी रक्कम कॅशमध्येच लागे. आज इतके, नंतर इतके हा प्रकार त्याला बिलकूल मान्य नसे. एक लाख खंडणी नाहीतर जीव… दोनपैकी कमी महत्त्वाचं वाटतं ते मला दे हा त्याचा खाक्या होता.

मन्याला ज्यावेळी पहिल्यांदा न्यायालयात (court) शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळी न्यायाधीशांसह सरकारी वकील, ज्यांची तक्रार होती ते आणि ज्यांनी त्याला जेरबंद केले त्या सगळ्यांना त्यानं न्यायालयातच बघून घेईंन अशी धमकी दिली होती. कारण शिक्षा फक्त सहा वर्षाची होती.

शिक्षा भोगत असताना पळून आल्यावर त्यानं त्याला शोधून जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी दोन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला. पण अधिकारी घरी नसल्यानं त्याचा प्लॅन सफल होऊ शकला नाही.

एका ट्रॅव्हल कंपनीच्या (travel company) मालकावर मन्यानं हल्ला केला त्यावेळी मन्यानं ऍसिडचा वापर केला होता. त्या माणसाला त्याच्या चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. तेव्हापासून धमकी देताना तो सांगायचा… बऱ्या बोलानं एक लाख दे नाहीतर तुझा ‘चिन्या’ करून टाकीन.

(पुढील अंकी: मन्याची कारकीर्द)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वर्षे त्यांनी गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here