Twitter :

स्टॉकहोम (स्वीडन) :  

दिवाळीनंतर आलेल्या शनिवारची सोयीची वेळ साधून मराठी रसिक श्रोत्यांना एकत्र आणत भारतातील ‘दिवाळी पहाट’ च्या धर्तीवर स्टॉकहोमध्ये ‘दिवाळी दुपारी’ स्वरगंध हा अप्रतिम गाण्यांचा कार्यक्रम पार पडला.  

‘सूर निरागस हो’  या गजाननाच्या चरणीच्या आर्जवानं मैफिल सुरु झाली. सुरेशबुवा वाडकरांचे शिष्यत्व पत्करलेले आणि गेल्या काही वर्षांपासून स्वीडनला स्थायिक झालेले सौरभ रणदिवे मंत्रमुग्ध गात होते. त्यांना तितक्याच ताकदीने – चंद्रशेखर पोठाळकर साथ देत होते. या द्वयींनी संत नामदेवांची ‘काळ देहांसी आला खाऊं’, ‘माझे माहेर पांढरी’, संत तुकोबांचं ‘बोलावा विठ्ठल’ संत चोखामेळांच ‘अबीर गुलाल’ ‘येई वो विठ्ठले भक्तजन वत्सले’ अशी एकाहून एक सरस विठ्ठल-गीते गायली आणि श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले.

यावर मग नाट्यरसाचा साज चढवत ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘घेई छंद’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’  ही एकाहून एक सुश्राव्य गाणी झाली. पुढे ‘जेंव्हा तुझ्या बटांना’ हे श्रुंगार गीत झालं. या सगळ्या गाण्यांना – तबल्यावर सुव्रत आपटे अप्रतिम साथ देत होते आणि उत्स्फूर्त ‘वाह-वाह’ मिळवत होते. त्यांना उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून विशेष प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलं होते. त्या संधीच त्यांनी केलेलं सोन, त्यांचा रियाझ समोर दिसत होता. झंकारांतून सहज हृदयात झिरपत होता. सोबतीला पल्लवी भागवत यांनी केलेलं ओघवतं सूत्रसंचालन कार्यक्रमाची रंगात वाढवत होतं. श्रोत्यांनी तहानभूक हरपून मध्यंतरासाठीही थांबू नये म्हणावं, इथेच कार्यक्रमाचं यश सामावलेलं होतं.

अल्पोपहार आणि चहाच्या छोट्या विश्रांतीनंतर स्वप्ना शेट्ये हयांनी ‘फुललेले क्षण माझे’ तून उत्तरार्ध फुलवत नेला. पुढे ओंकार इनामदार यांनी ‘प्रथम तुला वंदितो’  असं गात – गणेशवंदनेने केलेली सुरुवात’ जय गंगे भागीरथी’  ‘टाळ बोले चिपळीला’ अशा एकाहून एक सुश्राव्य स्वराविष्कारांनी खुलवत नेली. त्यांनी ‘राग यमन’, ‘छोटा ख्याल’ तर उत्कृष्ट मांडलाच पण ‘खमाज रागा’तील लक्षण गीत आधी गाऊन दाखवत मग पुढे सहज त्या रागातील नाट्यगीत गायलं. प्रेक्षकांमधून आलेल्या ‘तबला वादनाच्या’ उत्स्फूर्त फर्माईशीला पूर्ण करत सुव्रत यांनी कडकडून टाळ्यांची दाद मिळवली. 

संगीतातील, गायनातील, वादनातील बारकावे सगळ्यांनाच कळले नसतीलही, पण एक सुंदर अनुभूती मात्र सगळ्यांच श्रोत्यांपर्यंत सहज पोहचली. कानडी मातृभाषा असणाऱ्या चंद्रशेखर यांनी सहज मराठी अभंग गायले तर मराठमोळ्या ओंकार यांनी कानडी भाषेतील सुंदर लक्ष्मीस्तवन गायलं. नितळ सुरांच्या जादुई जगात भाषेची बंधनही निखळलेली पहिली. रियाझातून आलेली सहजता-उच्चारातील स्पष्टता पहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here