@maharashtracity
पोलीस दलातर्फेही वीर पुत्राला देण्यात आली मानवंदना
धुळे: आसाममधील गुवाहाटी येथे सैनिकी रुग्णालयात उपचार घेतांना वीरमरण आलेले जवान निलेश माळी यांच्यावर बुधवारी दुपारी सोनगीर येथील शहीद भूमीवर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस दलातर्फे हवेत 21 राऊंड फायर करुन वीर पुत्राला मानवंदना देण्यात आली. यावेळी सोनगीर गावासह आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिक उपस्थित होते.
अंत्यसंस्काराचा विधी पार पडत असतानाच निलेश माळी अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यामुळे तेथील संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.

सोनगीर येथील भूमीपुत्र जवान निलेश माळी हे सहा महिन्यांपूर्वी आसाममधील मणिपूर येथे देशसेवा बजावीत असतांना शत्रूची गोळी लागून ते गंभीररित्या जखमी झाले होते. सैन्य दलाच्या विविध रुग्णालयांमध्ये जवान निलेशवर उपचार करण्यात येत होते. मात्र अखेर गेल्या शनिवारी (दि.24) रात्री साडेआठ वाजता जवान निलेशला वीरगती प्राप्त झाली.
निलेशचे पार्थीव बुधवारी सकाळी सोनगीर येथे आणण्यात आले. यावेळी फुलांनी व रांगोळ्यांनी गावपरिसर सजविण्यात आला होता. 200 मीटरचा तिरंगा झेंडा हातात घेऊन नागरिकांनी निलेशच्या पार्थीवाचे स्वागत केले. फुलांनी सजविलेल्या वाहनातून निलेशचे पार्थीव सोनगीर गावातील शहीद भूमीवर नेण्यात आले. यावेळी चौकाचौकात जवान निलेशच्या पार्थीवाचे पुजन करण्यात आले.
या प्रसंगी माजीमंत्री आ.जयकुमार रावल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, माजी सैनिक रामदास पाटील, जितेंद्र सरोदे, युवराज महाले आदी अधिकारी व कर्मचार्यांनी श्रध्दांजली वाहीली. त्यानंतर निलेशच्या पार्थीवाला मुखाग्नि देण्यात आला आणि सोनगीरचा वीरपुत्र अनंतात विलीन झाला.