By विजय साखळकर

@maharashtracity

हिंदी सिनेमांना मस्तान फायनान्स (Financer Haji Mastan) करू लागला. त्या काळात त्याचे सर्वच निर्मात्यांशी आणि दिग्दर्शकांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले. अर्थातच कुणी भेटण्यास आला तर मस्तान त्याला टाळत नसे. त्याच्या अडचणी जाणून घेत असे. शक्य झालं तर त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असे.

याच त्याच्या सवयीतून ‘सोना’ नावाची एक दाक्षिणात्य अभिनेत्री (South Indian actress) त्याला भेटायला आली. तिला सिनेमात, अर्थात हिंदी सिनेमात स्वत:ची कारकीर्द बनवायची होती. (Bollywood movie)

कोणत्याही क्षेत्रात फायनान्सरला प्रचंड मान असतो आणि त्यांच्या-त्याच्या लहरी सांभाळल्या जातात. कारण फायनान्सरनं हात मागे घेतला तर तुमचा प्रोजेट बोंबलला.

ओळख झाल्यानंतर मस्ताननं तिला तो फायनान्स करीत असलेल्या एका फिल्मच्या निर्मात्याशी भेट घालून दिली आणि त्या निर्मात्यानं (Film Producer) तिला आपल्या या नव्या व्हेंचरमध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी साईन केलं.

Also Read: मस्तानची सद्दी

मस्ताननं त्यानंतरही काही सिनेमांसाठी फायनान्स करतेवेळी सोना हीच नायिका ही अट टाकली आणि निर्मात्यांनी ती आनंदानं मान्य केली. सोना दिसायला अत्यंत सुंदर होती. पण हिंदी सिनेमात तिचा कुणी गाॅडफादर नव्हता. मस्तानचा वरदहस्त म्हणजे प्रश्नच प्रश्नच नव्हता. सोनाची करियर सुरू झाली.

एकदम बिझी नायिका असा तिचा लौकिक फिल्मी नियतकालिकांतून चकाकू लागला. पडद्यावरच्या इतर नायिकांना ती खाऊन टाकेल अशा आशयाच्या पैजाही या क्षेत्रात लागल्या.

सोनाचा पहिलाच हिंदी चित्रपट रिलीज झाला. पण आठवडाभरात त्या सिनेमाचा आणि सोनाचाही रंग उडाला. बाॅक्स ऑफिसवर (Box office) सिनेमा दणकून आपटला होता. थोड्या थोड्या अंतरानी आलेले सोनाचे त्या वर्षातील सर्वच हिंदी चित्रपट दणकून आपटले.

सोनाला आपणहून साईन करण्यासाठी कुठलाच निर्माता पुढे येत नव्हता. अगदी तिचं नाव घेतलं तर सिनेमा रिलीज होईपर्यंतच्या कुठल्याच आर्थिक सामाजिक अडचणी येणार नाहीत, याची खात्री असूनही सोनाला कुणी साईंन करू पाहत नव्हतं

एक दोन निर्मात्यांना मस्ताननं त्याबद्दल तडक विचारलं. त्यांनी चक्क दिग्दर्शकांकडे (Film director) बोट दाखविलं. मग त्यानं दिग्दर्शकांचीच शाळा घेतली. दिग्दर्शक हा सिनेमाला दिशा आणि दशा देऊ शकतो. हे माध्यम दिग्दर्शकाचंच असतं. त्यामुळे मस्ताननं घेतलेल्या शाळेचा दिग्दर्शकांवर फारसा परिणाम झाला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात मस्तानला सुनावलं. त्यामुळे मस्तानचाही निरुपाय झाला.

“आपकी शिफारिश है इसलीये उसे चलाया. स्टारकास्ट अच्छी थी… इसलिये लोगोंने देखा. लेकिन भिड इकट्ठा करने में वह लडकी नाकामयाब रही. सीर्फ खूबसुरती यह फिल्डमे कामयाबी नही रहती. फिल्म शूटिंग के बाद जब स्क्रिनपर जाती है तो देखनेवाले सीर्फ खूबसुरती देखकर थिएटर मे नही आते. ऑडियन्स की नजर मे सोना फेल है…. प्रोड्युसर आप से फायनान्स लेते है वह आप को चुकाना पडता है.. बाकी खर्चा रहता है…. डिस्ट्रिब्युटर फिल्म (Film distributors) ऑडियन्स की हिसाब से लेती है….ऑडियन्स (Audience) के हिसाब मे सोना फेल हो जाती है…. तो वह फिल्म लेगे नही…..”

मस्तान समजला त्यानं मान्य केलं. सोना ही गर्दी खेचणारी हिरोईन नाही हे त्याला समजलं. पण सोनाला स्वत: मस्तान नाकारु शकत नव्हता. मग आपल्या आवडीच्या या स्त्रीसाठी त्यानं तिलाच निर्मितीसाठी एक कंपनी काढून दिली. सोना मूव्हीज. सुरुवातीला जुहू (Juhu) आणि नंतर तिचं ऑफिस नवी मुंबई (Navi Mumbai) येथे हलविण्यात आलं. या कंपनीचं नावही तिच्या नावावर ठेवलं होतं. त्याची मालकीणही तिच होती. साहजिकच सोना मूव्हीजमध्ये सोना हिलाच मुख्य भूमिका मिळत होती.

परिणाम असा झाला की सोना मूव्हीजचे भराभरा सिनेमे आले. पण ते यशस्वी ठरले नाहीत. त्यातच पुढे सोना आणि मस्तान यांच्यातही वितुष्ट आले. मस्तानच्या आयुष्याचा तो उत्तरार्ध होता. त्याच्या जवळची माणसं सांगतात की सोना दुरावल्याचं मस्तानच्या मनाला इतकं लागलं की मस्ताननं त्याच्या घरात एक काचेची चेंबर बनवली व त्यात तो राह़त होता. अर्थात मस्तानविषयी असणारं वाचकांचं कुतूहल शमविण्यासाठी ही आवई उठविली गेली असावी असंही काही लोक सांगतात.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here