स्लॅबचा भाग कोसळून मुलगी जखमी; यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबईत मंगळवारपासून संततधार धरलेल्या पावसाने बुधवारी देखील मुसळधार कायम ठेवली होती. यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईत वाहतूकीवर परिणाम झाला. कित्येक ठिकाणी पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक रेंगाळत होती. तर मध्य रेल्वेवर अर्ध्या तास उशिराने गाड्या धावत असल्याचे चित्र होते.

दरम्यान, राज्यासह मुंबईतील पावसाळी स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार आगामी २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाचा पाऊस पाडणार आहे. त्याचवेळी ५० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहू लागतील. मंगळवारपासून सुरु असलेला पाऊस बुधवारी दिवसभर कायम होता. यातून मंगळवारपासून २४ तासात कुलाबा येथे ९८.४ मिमी तर सांताकुझ येथे ५२.८ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. तर दुपारपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत कुलाब्यात ६३ तर सांताक्रुझ येथे ४५ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, बुधवारी शहरात ५८.४७, पूर्व उपनगरात ४८.८० तर पश्चिम उपनगरात ५०.६३ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली.

तक्रार :
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शहरात झाडे किंवा फांद्या कोसळण्याच्या एकूण २७ तक्रारी करण्यात आल्या. तर घरे किंवा भिंती पडझडीच्या घटनेत एकूण २ घटना घडल्या. तसेच शॉर्टसर्किटच्या एकूण ३ तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

स्लॅबचा भाग कोसळून मुलगी जखमी :
बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास भांडूप पश्चिमेकडील झकेरीया इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील रुम नंबर २०२ मधील स्लॅबचा भाग कोसळून एक मुलगी जखमी झाली. या मुलीचे नाव तसीन शेख असून ती पाच वर्षाची आहे. या मुलीस उपचारासाठी एसआरसी या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालघरमध्ये कोसळधार :
बुधवारी दिवसभर झालेल्या पाऊस नोंदीत पालघर जिल्ह्यात पावसाची सर्वोच्च नोंद झाली. मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पालघरमध्ये १६० मिमी एवढी पावसाची नोंद झाली.

यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश :
राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते बुधवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकार्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here