Twitter : @maharashtracity

मुंबई

’इंडिया आघाडी कोणत्याही एका व्यक्ती किंवा पक्ष यांच्या विरोधात नसून ती हुकूमशाहीच्या विरोधात आहे. तसेच राज्याच्या चाव्या अजित पवार यांच्या हातात असल्या तरी त्यांची अडचण जाणून आहोत, शिवाय आम्ही नको ते व्हीडिओ बघत नाही’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तिन्ही वादग्रस्त राजकीय घडामोडीवर भाष्य केले. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले होते. त्यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या प्रांगणात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी इंडिया आघाडीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची बैठक बंगळुरु येथे झाली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीचे नाव इंडिया असे आहे. मात्र ही आघाडी एका पक्षाविरोधात किंवा व्यक्ती विरोधात नाही. तर हुकूमशाहीच्या विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदावर लोक येतात आणि जातात. मात्र जो पायंडा पडतो आहे, तो घातक असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच अजित पवार यांची भेट घेतली का असे उद्धव ठाकरे यांना विचारले असता अजित पवार यांनी चांगलं काम करावे, अशी शुभेच्छा त्यांना दिल्याचे ठाकरे म्हणाले.

राज्यात अतिवृष्टी असल्याने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करु नका असे पवार यांना सांगितल्याचे ठाकरे म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत अडीच वर्षे काम केले. त्यांच्याकडे राज्याच्या चाव्या असल्या तरी त्यांची अडचण काय ते समजू शकतो, असे ते खोचकपणे म्हणाले. भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांचे काल व्हिडिओ वायरल झाले. यावरुन सभागृहात गोंधळ माजला होता. या बाबत उद्धव ठाकरे यांना छेडले असता, ’आम्ही तसले व्हिडीओ पाहत नाही‘ असे ठाकरे म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here