@maharashtracity

धुळे: महापालिका व पोलिस प्रशासनातर्फे धुळ्यात गणेश विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. शहरात सातव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीला पांझरा नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे नदी किनारी ३७ ठिकाणी विसर्जनाची सुविधा केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यासह शहरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा होतो आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात रोषणाईने झळाळणारे चौक यंदा सुनेसुने आहेत. शहरात पहिल्या टप्प्यात दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यानंतर मंगळवारी पाचव्या दिवशी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

तिसर्‍या टप्प्यात सातव्या दिवशी व शेवटच्या टप्प्यात अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. त्याचबरोबर पांझरा नदीपात्रात ३७ ठिकाणी विजर्सनासाठी सोय करण्यात येणार आहे.

या ठिकाणी स्वच्छ पाण्याने भरलेले हौद मूर्ती विसर्जनासाठी ठेवण्यात येतील. त्याचबरोबर मूर्ती व निर्माल्य संकलनाची सोयही असेल. हत्तीडोह येथे विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन स्थळी गणेशमूर्ती संकलनासाठी वाहनांची व्यवस्था असेल.

त्याचबरोबर प्रत्येक विसर्जन स्थळी महापालिकेचे कर्मचारी तैनात असतील. त्यासाठी एकूण १६६ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा नियमांचे पालन करून ३८० मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. त्यापैैकी पाचव्या दिवशी १० मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील सात मंडळांचा समावेश आहे.

विसर्जन मिरवणुकीसह वाद्य वाजवण्यास परवानगी नाही. तसेच घरगुती व खासगी, सार्वजनिक मंडळांना रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जनासाठी वेळ दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here