@maharashtracity

आयसीएमआरच्या विधानावर तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

मुंबई: बुस्टर डोसबाबत आयसीएमआरने स्पष्ट भुमिका घेतली आहे. तुर्तास बुस्टर डोसची गरज नसल्याचे या संस्थेने स्पष्ट केले आहे. मात्र, यावर राज्यातील कोरोना अभ्यासकांकडून मतमतांतरे मांडण्यात आली.

सध्या मृत्यू दर कमी असला तरीही जे मृत्यू होत आहेत त्यात सहव्याधीग्रस्त रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे त्यांना बुस्टर डोस (Booster dose of covid vaccine) न मिळाल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

तर काही तज्ज्ञांच्या मते आयसीएमआरचा (ICMR) निर्णय प्रयोगांवर अवलंबून असून सहमती व्यक्त करण्यात आली. देशात पहिल्या डोसचे १०० कोटी लसवंत झाले असताना दुसऱ्या डोसच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु आहे. मात्र दोन डोसनंतर बुस्टर डोस घेणे आवश्यक असल्याचे आतापर्यंत सांगितले जात असताना यावर आता उलटसुलट चर्चा होत आहे.

राज्याचे कोरोना तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे (Dr Subhash Salunkhe) यांच्या मते बूस्टरची गरज नसल्याच्या दाव्याला वैज्ञानिक अधिष्ठान मिळत नसल्याने आयसीएमआरकडून हे विधान करण्यात आले. मात्र बुस्टर डोस तुर्तास नको या आयसीएमआरच्या विधानाची अपेक्षा नव्हती असे मत डॉ. साळुंखे यांनी मांडले.

प्रत्येकाने दुसरा डोस प्राधान्याने घेणे आवश्यक आहे हे सर्वांनाच मान्य आहे. तरीही अद्याप बहुतांश जणांनी कोरोनाची दुसरी मात्रा घेतली नाही. ती पूर्णत्वाकडे नेणे आवश्यक आहे. मात्र दुसऱ्या डोसनंतर तिसऱ्या म्हणजेच बुस्टर डोसची आवश्यकता लागेल का यावर अजूनही चर्चा आणि धांडोळा होणे आवश्यक आहे.

अशावेळी बुस्टर डोसची गरज नाही असे म्हणणे योग्य नसून बहुतांश गंभीर आजार असलेले सहव्याधी रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना तिसऱ्या किंवा बुस्टर डोसची आवश्यकता आहे. त्यामुळे तिसरा डोस आवश्यक असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.

तर कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी सांगितले की, रुग्ण कमी होत असून तिसरा डोस देण्यास वैज्ञानिक अधिष्ठान नसल्याचे आयसीएमआरने म्हणणे मांडले आहे. मात्र हाच डोस पुन्हा घेऊन किती फायदा होईल याची खात्री त्यांना नाही.

बाकीच्या देशांमध्ये तिसरा डोस देण्यास सुरुवातही झाली आहे. तिसऱ्या डोसचा कितपत फायदा होईल यावर साशंकित मत देण्यात आले आहे. मात्र, एक वर्षानंतर अभ्यास करुन बुस्टर डोस देण्यात यावा असे मत डॉ. सुपे यांनी व्यक्त केले.

कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या मते आयसीएमआरने वैज्ञानिक अधिष्ठानावर मत प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्या मताशी सहमत आहे. प्रत्येक स्थितीवर डोसचे निर्णय घेण्यात आले असून तुर्तास गरज नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट म्हटले असल्याचे डॉ. पंडित यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here