@maharashtracity

मुंबई: मुंबईत सिमेंट काँक्रीटच्या जंगलात जमिनीत पावसाचे पाणी मूरत नाही. यावर पर्याय म्हणून पर्जन्यजलवाहिन्यांच्या प्रत्येकी १०० फूट अंतरावर पाझरखड्डे बनविण्यात यावेत. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्रात न जाता ते जमिनीतच मुरून जलसाठयात वाढ होण्यास मदत होईल, अशी महत्वाची सूचना माजी महापौर व भाजपच्या नगरसेविका अलका केरकर (BJP corporator Alka Kerkar) यांनी आयुक्तांना केली आहे.

जगभरातील वातावरणात सध्या कमालीचा बदल जाणवतो आहे. हिवाळ्यात, उन्हाळ्यात केव्हाही पाऊस पडत आहे. हवामान लहरी झाले आहे. तर दुसरीकडे ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. (Environment is in danger due to global warming)

जगभरात, अगदी मुंबईतही विकासकामे झपाट्याने होत आहेत. रस्ते, पदपथ, शासकीय, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी या ठिकाणी बहुतांश ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वत्र सिमेंट काँक्रीटची जंगले वाढली असून नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास होत आहे.

त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी दरवर्षी २ हजार मिलीमिटर पेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडूनही त्यातून जमिनीवर पडणारे पाणी जमिनीत न मुरता ते वाहत वाहत समुद्रात जाऊन मिळते. पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने जमिनीतील जलसाठ्याची पातळी खालावत चालली आहे.

वास्तविक, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे कार्यरत असतानाच मुंबईत नव्याने निर्माण होणाऱ्या सोसायटयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain Water harvesting) योजना राबविणे बंधनकारक करण्यात आले होते.

मात्र असे असतानाही त्यावर अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी जमिनीतील जलसाठ्याच्या (ground water) पातळीत वाढ होताना दिसत नाही. जमिनीची दिवसेंदिवस धूप होत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे, असे नगरसेविका अलका केरकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत दरवर्षी काही सखल भागात पावसाचे पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होताना व त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होताना दिसून येते.

ही वस्तुस्थिती पाहता, मुंबई महापालिकेने (BMC) तिच्या हद्दीतील पर्जन्यजलवाहिन्यांच्या प्रत्येक १०० फुटांच्या अंतरावर पाझर खड्डे निर्माण करावेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन न मिळता ते पाणी जमिनीत मुरेल व जमिनीतील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात चांगली वाढ होईल.

तसेच, पुरस्थितीलाही काही प्रमाणात आळा बसेल, असे नगरसेविका अलका केरकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here