@maharashtracity

काळ्या फिती लावून करणार निषेध

मुंबई: राज्य सरकारी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागातील अनुभवी औषध निर्माते (pharmacist) संतप्त झाले आहेत. औषध निर्माते गट ब १२ जागांसाठी एमपीएससी (MPSC) परिक्षेतून भरती करण्याचा सरकारने घाट घातला असल्याचा जोरदार आरोप या औषध निर्मात्यांकडून होत आहे.

औषध निर्माते गट ब च्या १२ जागांसाठी एमपीएससीतून भरती करण्यापेक्षा आधीच अनुभवी आणि शैक्षणिक अर्हता असलेल्या आणि सरकारी सेवेत असलेल्या औषध निर्माते गट क पदावरील औषध निर्मात्यांची पदोन्नती का करत नाहीत असा संतप्त सवाल पात्र औषध निर्माते करत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून पदोन्नतीसाठी (promotion) पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील औषध निर्माते काळ्या फिती लावून काम करत आहेत.

दरम्यान, राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांशी (medical colleges) संलग्न असलेल्या रुग्णालयातून ५१ औषध निर्माते काम करत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणावरील रुग्णालयात ते काम करत असल्याने ते विखुरलेल्या स्थितीत आहेत. सध्या एमपीएससीने १२ औषध निर्माता गट ब जागांसाठी जाहिरात प्रसारीत केली आहे.

यावर पात्र उमेदवारांचे प्रतिनिधी पंकज येवले यांनी सांगितले की, औषध निर्माता गट क पदावर काम करत असून आम्हाला प्रमोशन देणे आवश्यक आहे. औषध निर्माते गट ब च्या १२ जागांसाठी लागणारे शिक्षण, तसेच १५ ते २० वर्षाचा अनुभव आमच्याकडे आहे. त्यामुळे विभागाने आमचा विचार करणे आवश्यक आहे.

सध्या तिथे नियुक्ती नसताना गट ब च्या जबाबदाऱ्या कधी कधी आम्ही सांभाळतो. या पदोन्नती साठी २००६ पासून पाठपुरावा करत असलयाचेही येवले यांनी सांगितले. तसेच दोन ते तीन वर्षापासून याबाबत पत्रव्यवहार सुरु असल्याचे सांगण्यात आले. निवेदनातून निदर्शनात आणून देऊन देखील नेमणूक करण्याचे काम विभागाचे असूनही ते तसे करत नसल्याची तक्रार औषध निर्माते करत आहेत.

दरम्यानच्या काळात सह संचालक डाॅ. अजय चंदनवाले यांना भेटून निवेदन दिले असता त्यांनी देखील प्रमोशन द्यावे असा अहवाल सादर केला आहे. यातून एमपीएससीव्दारे भरती झाल्यास आम्हाला याच पदावर निवृत्त व्हावे लागेल असे पात्र उमेदवारांचे प्रतिनिधी पंकज येवले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here