@maharashtracity

धुळे: धुळे शहरातील कोळवले नगराजवळील भोलेबाबा नगरात वास्तव्यास असलेल्या एका न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला पोलिसांना आढळून आले.

न्यायाधीशांसह कुटुंबिय बाहेरगावी गेलेले असल्याने किती रुपयांचा ऐवज, रोकड चोरीला गेली हे समजू शकलेले नाही. याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद झालेला नाही.

न्यायाधीशांच्या घरी चोरी (robbery at the house of judge) करण्यापर्यंत चोरट्यांची हिंमत वाढली असून पोलिसांपुढे चोर्‍या थांबविण्याचे आव्हान आहे.

शहरातील कोळवले नगर शेजारच्या भोलेबाबा नगरात न्यायाधिश एच.ए.एस.मुल्ला हे कुटुंबियांसमवेत रहातात. पारिवारीक कारणानिमित्त मुल्ला यांचा परिवार बाहेरगावी गेलेला असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधली. बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे पोहचले. शिवाय श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही सूचित केल्याने ते देखील घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलिसांना तुटलेले कुलूप व कडी बंगल्याच्या आवारात सापडली. तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.

घटनास्थळी आलेल्या श्‍वानाने परिसरात काही अंतरापर्यंत माग काढला. त्यानंतर ते तेथेच घुटमळले. तर ठसे तज्ज्ञांना काही ठसे मिळाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती न्यायाधिश मुल्ला यांना देण्यात आली असून ते घरी परतल्यानंतरच चोरीस गेलेल्या ऐवजाबद्दल माहिती मिळू शकणार आहे. शिवाय त्यांच्या फिर्यादीनंतरच गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here