@maharashtracity

कोस्टल रोड प्रकल्पासाठी विषेश निधीतून उचल

मुंबई: ‘कोस्टल रोड’ च्या कंत्राटदार, सल्लागाराला देण्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेला २ हजार कोटींचा निधी अपुरा पडल्याने आता ‘विषेश निधी’ मधून ५०० कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत.

यासंदर्भातील माहितीपर प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठीकित मंजुरीसाठी येणार आहे.

तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च होणार असलेल्या देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’च्या (coastal road project) कामासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात (BMC Budget) तरतूद केलेल्या २ हजार कोटी रुपयांमधून आतापर्यंत या कामावर पालिकेने १ हजार ९९६ कोटी खर्च केले आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत या कामासाठी आणखीन ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे ५०० कोटी रुपये ‘विशेष निधी’ (पायाभूत सुविधा विकास निधी) (emergency infrastructure requirement fund) मधून उपलब्ध करण्यात येणार आहे.

त्यामुळे ‘कोस्टल रोड’ चे काम निधी अभावी थांबू नये व हे काम युद्धपातळीवर सुरुच ठेवण्यासाठी पालिकेने ‘विषेश निधी’ मधून आवश्यक ५०० कोटींची तातडीने उचल घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कोस्टल रोड’ च्या कामासाठी ५०० कोटींची उचल घेण्याबाबतच्या प्रस्तावाला पालिकेतील पहारेकरी असलेल्या भाजपकडून (BJP) कदाचित जोरदार आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईतील पश्चिम उपनगरापासून शहर भागापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची (traffic congestion) समस्या मार्गी लावण्यासाठी व इतर उद्देश साध्य करण्यासाठी बहुउद्देशीय १०.५८ किलोमीटर लांबीच्या या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे.

सध्या या ‘कोस्टल रोड’ चे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे काम निधी अभावी बंद पडू नये यासाठी पालिका अधिक काळजी घेत आहे.

या ‘कोस्टल रोड’ च्या कामाअंतर्गत पॅकेज १,२ व ४ चे कंत्राटदार, सल्लागार व साधारण सल्लागार यांना त्यांचा कामाचा मोबदला जानेवारी २०२२ पर्यंत देण्यासाठी ५०० कोटींची आवश्यकता होती. त्यामुळेच पालिकेने ५०० कोटी रुपये ‘विशेष निधी’ (पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष निधी अंतर्गत जमा होणारी रक्कम ही मुंबई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्प कामाकरिता वापरायची आहे. त्या अनुषंगाने कोस्टल रोड आणि गोरेगाव – अंधेरी लिंक रोड (Goregaon – Andheri Link Road) या कामांसाठी होणारा खर्च हा या विषेश निधीमधून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here