@maharashtracity

घावूक व्यापारी देखील हबकले

By Milind Mane

महाड (रायगड): महाड तालुक्यातील दासगाव गावात भरणाऱ्या मासळी बाजाराला (fish market) गेली अनेक वर्षाची परंपरा आहे. या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (corona pandemic) हा बाजार बंद होता. त्यातच आलेला पूर (flood) आणि पावसाळा याचा परिणाम देखील सुक्या मासळी विक्रीवर झाला.

नुकताच हा बाजार पुन्हा सुरु झाला असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि याचा परिणाम मासळी बाजारावर जाणवू लागला आहे. त्यातच सुक्या मासळीचे (dry fish) दर देखील गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह घावूक व्यापारी देखील हबकले आहेत.

महाड तालुक्यातील दासगाव मधील आठवडी बाजार हा फक्त सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटीशकाळात (Colonial era) याठिकाणी बंदर (port) होते. होडीच्या सहाय्याने याठिकाणी सुकी मासळी आणि इतर मालाची ने – आण केली जात असे. या परिसरातील आणि महाड खाडीपट्टा ते थेट भोर, खानातून सुकी मासळी नेण्यासाठी याठिकाणी ग्राहकांची गर्दी असते.

दिघी, म्हसळा, श्रीवर्धन आदी ठिकाणाहून सुकी मासळी याठिकाणी येते. चांगल्या दर्जाची सुकी मासळी दासगाव मध्ये मिळत असल्याने याठिकाणी आजदेखील कायम गर्दी असते. खिशाला परवडेल असा भाव या सुक्या मासळीला याठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदीला गर्दी असते.

मात्र गेल्या दोन वर्षापासून याठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारावर कोरोनाचे सावट दिसू लागले आहे. त्यातच सुक्या मासळीचे दर प्रतिवर्षाला चढत गेल्याने सर्वसामान्य माणूस या बाजारापासून दूर जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दासगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण अद्याप जरी नसले तरी सुरवातीच्या काळात हा परिसर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच हबकला होता. सद्यस्थितीत महाड (Mahad) तालुक्यात २६ च्या आसपास कोरोना रुग्ण (corona patients) आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांमुळे महाड तालुक्यात देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे दासगाव मध्ये शनिवारी भरवल्या जाणाऱ्या सुक्या मासळीच्या बाजारावर कोरोनाचे सावट पसरले आहे.

याठिकाणी सोडा आजही चक्क ११०० रुपये, सुके बोंबील ६०० रुपये, अंबाडी देखील ४०० रुपये, कोलिम, वाकटी, मासे सुकट, आदींचे दर देखील पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आहेत. यामुळे ग्राहक नाराज होवून जेव्हढे घेता येईल तेव्हढेच घेवून पाठ फिरवत आहेत. या बाजारावर आता घावूक व्यापाऱ्यांची नजर असल्याने ते याठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here