@maharashtracity

धुळे: शहरातील जामचा मळा येथे झालेल्या ११ लाखाच्या घरफोडीचा यशस्वी तपास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीला (LCB) यश आले आहे. एलसीबीने गुजरातला (Gujarat) पळून गेलेल्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करीत त्याच्याकडून ११ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दि. २९ ऑगस्ट रोजी जामचा मळा येथील सुलतानिया मदरसा जवळ राहणारे इमरान शेख सलिम यांच्या घरात जबरी घरफोडी करीत कपाटात ठेवलेले ११ लाख १० हजार रुपये रोख व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एलसीबीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सक्त सूचना दिल्या.

त्यावरून एलसीबीने तपास सुरू केला. त्यात हि घरफोडी धुळे (Dhule) शहरातील सराईत गुन्हेगार अकबर अली उर्फ जलेल्या कैसर अली शाह, रा. जामचा मळा याने केल्याचे समजले. तो मढी, बारडोली, गुजरात येथे पळून गेला असल्याने एलसीबी पथकाने बारडोली, सुरत भागात जाऊन आज दि. ४ रोजी पहाटे जलेल्या शाह याला बारडोली येथून नातेवाईकाच्या घरातून पकडले.

त्याला ताब्यात घेऊन धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून विचारपूस केली असता, त्याने घरफोडीची कबुली दिली. तसेच त्याच्या घरातून चोरी केलेला मुद्देमाल २ पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला. यात ११ लाख २८ हजार रुपये रोख रक्कम, २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील झुमके असा एकूण ११ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगांव रोड पोलिसांच्या ताब्यात आरोपीला सोपविण्यात आले आहे. हि कामगिरी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि शिवाजी बुधवंत, उपनिरिक्षक योगेश राऊत, हे.कॉ. रफिक पठाण, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, पो.ना. गौतम सपकाळे, राहुल सानप, पो.कॉ. कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here