@maharashtracity

मुंबई: भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील लहान बालकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट होऊन जंतूसंसर्गामुळे (septic infection) चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. (Newborn babies death issue)

भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी, मांडलेल्या सभा तहकुबीअंतर्गत विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत समर्थन दिले. मात्र सभा तहकुबीबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाने साथ न दिल्याने भाजप (BJP) एकाकी पडली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, सभा तहकूबी मागे घेण्याची विनंती करूनही भाजपने ती मान्य केली नाही.

त्यामुळे अध्यक्षांनी नियमित कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे भाजप नगरसेवक काहीसे आक्रमक झाले. अखेर सभा संपताना भाजप सदस्यांनी प्रशासन व सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवत सभात्याग (walkout) जाहीर केला.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सभा तहकुबी मांडताना, ‘त्या’ ४ बालकांच्या मृत्यूला पालिकेने प्रसूतिगृह चालवायला दिलेली मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रा. लि. ही खाजगी संस्था जबाबदार असल्याचा आरोप करीत या संस्थेचे कंत्राट त्वरित रद्द करावे, तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpable homicide) दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली.

यावेळी, विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी, आरोग्य सुविधांसाठी साडेचार हजार कोटी रुपये दरवर्षी खर्चूनही पालिका रुग्णालये, प्रसूतिगृहे या ठिकाणी भांडुप सारख्या दुर्घटना घडून लहान बालकांचा मृत्यू होणे निषेधार्ह आहे, अशी टोकेची झोड उठवत प्रशासनावर तोफ डागली. तसेच, या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

पालिका आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी, या दुर्दैवी प्रकरणात संबंधितांची चौकशी करावी आणि पालिकेची प्रसूतीगृहे अद्ययावत करावीत, अशी मागणी केली.

भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर (Rajeshree Shirwadkar) आणि ज्योती आळवणी (Jyoti Alavani) यांनीही पालिकेची रुग्णालये, प्रसूतीगृहे अद्यावत करण्याची व भांडुपच्या घटनेप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी, या घटने प्रकरणी चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

भाजपकडून दुःखद घटनेचे राजकारण -: यशवंत जाधव

भांडुप येथील प्रसूतीगृहात ४ बालकांचा मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज भाजपने उपस्थित केलेल्या विषयाला समर्थन दिले. तसेच, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, या दुःखद व दुर्दैवी घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने केला, असे आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

भाजपने, दरवेळी कोणत्याही घटनेचे घाणेरडे राजकारण करून पालिका सभा, स्थायी समिती बैठकीत सभा तहकुबीची मागणी करणे, सभात्याग करणे , गदारोळ घालणे, सत्ताधारी शिवसेनेला नाहक बदनाम करणे आदी प्रकार थांबवावेत. भाजपने असे राजकारण करून मुंबईकरांना विकास कामांपासून वंचित ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here