@maharashtracity

ओमिक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन (Cape Town South Africa) ते दुबई ते दिल्लीमार्गे मुंबईत आणि नंतर कल्याण डोंबिवलीत आलेल्या 33 वर्षीय तरुणाची ओमिक्रॉन व्हेरियंट जीनोम सिक्वेन्सिंग पॉझिटिव्ह आल्याने हा तरुण ओमिक्रोन व्हेरियंटचा रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan – Dombivli) क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस (covid vaccination) घेतलेली नसल्याचे सांगण्यात आले. ओमिक्रॉन (omicron variant) विषाणू मुंबईच्या वेशीवर आल्याने चिंता वाढली आहे.

या प्रवाशाच्या आरोग्य तपशीलानुसार या तरुणाला 24 नोव्हेंबर रोजी सौम्य ताप आला होता. त्याची तपासणी केली असता त्याच्यात इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये (covid care center) उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत.

या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. या दरम्यान झांबिया (Zambia) देशातून पुणे (Pune) येथे आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (NVI) प्राप्त झाला आहे. या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नसून त्याच्यात डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3839 प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी (RTPCR test) करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या 17107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here