@maharashtracity

स्थायी समिती सभेत सदस्यांची मागणी

धुळे: शहरात सर्वत्र डेंग्युने (Dengu) हाहःकार माजला असून महापालिकेच्या (DMC) ठेकेदाराची बेफिकिरीच याला कारणीभूत आहेे. त्यामुळे ५ कोटींचा ठेका घेतलेल्या ठेकेदारविरुद्ध कारवाई करा अशी मागणी भाजप नगरसेवक शितल नवले (BJP Corporator Sheetal Navale) यांनी स्थायी समिती सभेत केली.

शीतल नवले म्हणाल्या, मच्छर डास मारण्यासाठी महापालिकेने ५ कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. तरीही शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून डास, मच्छरांचा नायनाट होत नाही. प्रशासनही ठेकेदाराकडून काम करुन घेण्यात अपयशी ठरत आहे. या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा.

डेंग्युची बाधा झालेल्यांनी उपचारासाठी जी रक्कम खर्च केली, ती ठेकेदाराकडून वसुल करा अशीही मागणी त्यांनी केली. तर एलईडी दिवे बसविणार्‍या ठेकेदाराकडून अटीशर्तींचा भंग होत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी केली.

महापालिकेत सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत डेंग्यूवरुन चांगलीच वादळी चर्चा झाली. या सभेत ठेकेदाराच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी संशय व्यक्त केला.

नगरसेवक शितल नवले यांनी डेंग्यु,मलेरियाच्या प्रकोपाला प्रशासनाचा गलथान कारभार असल्याचा आरोप केला. ठेकेदाराला कार्यादेश देवून ९० दिवस उलटून देखील जीपीएस ट्रॅकींग (GPS tracking) का नाही, स्वॉफ्टवेअर तयार करुन टँगींग का तयार केले नाही. ठेकेदाराचे ७७ आणि महापालिकेचे २२ कर्मचारी असताना देखील मच्छरांचा नायनाट का होत नाही? असे प्रश्न उपस्थित केले.

महापालिका आणि खाजगी दवाखाने लिंकिंग करुन डेंग्यु रुग्णांबाबत माहिती का घेतली जात नाही. ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांच्या हजेरीची माहिती महापालिकेला का दिली जात नाही, असे अनेक प्रश्‍न नगरसेवक नवलेंनी उपस्थित केले.

तसेच डास, मच्छर मारण्यासाठी ठेकेदाराला आपण ५ कोटी रुपये देतो, त्या बदल्यात २०० डास तरी मेलेत का? असाही प्रश्न नवलेंनी केला.

यानंतर विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी एलईडी दिव्यांचा (LED lights) मुद्दा मांडला. संबंधित ठेकेदारानेे दोन कार्यालये उघडली. अटीशर्तीनुसार मोबाईल नंबर देणे, कोणत्या भागात किती काम झाले, याची माहिती देणे ठेकेदाराला बंधनकारक होते. मात्र काम झालेले नसताना देखील एलईडी दिव्यांचे काम करणार्‍या ठेकेदाराला एक कोटी रुपये बिल देण्यात आले, अशी नाराजी देवरे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here