By विजय साखळकर

@maharashtracity

मुंबई अंडरवर्ल्डमधील (Mumbai Underworld) पहिली गोळी १९६९ साली चालली. त्याआधी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे वापरली जात होती. सन १९६९ साली पहिली गोळी सुटली आणि तो हुकूम करीमलाला (Kareem Lala) याचा होता. मात्र ज्याच्यासाठी गोळी भरली होती तो यातून वाचला आणि भलताच मारला गेला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime branch) अवघ्या काही तासांतच ही केस क्रॅक केली.

रमझानचे (Ramadan) दिवस होते. रात्री युसूफ पटेल (Yusuf Patel) हा आपल्या मित्रांसोबत डोंगरीतील अली जलाल याच्या ए-वन या मिठाईच्या दूकानात मिठाई खाण्यासाठी येत असे. १९ नोव्हेंबर १९६९ च्या रात्री उस्मान दूधवाला आणि इसामुद्दीन यांच्यासोबत युसूफ दुकानात आला. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्याया दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी युसूफच्या कानशिलाला घासून गेली आणि मागे असणारा वाटसरू मारला गेला. दुसरी गोळी युसूफच्या खांद्याला भेदून आरपार गेली. युसूफ कोसळला. त्याला उस्मान दूधवाल्यानं इस्पितळात हलवलं.

इसामुद्दीन हा युसूफ पटेलचा अंगरक्षक होता. त्यानं आपल्याकडच्या पिस्तुलांने युसूफवर गोळ्या झाडणाऱ्या पठाणांवर (Pathan) गोळ्या झाडत पाठलाग सुरू केला. त्यात इतर बघे सामील झाले. त्यामुळे दोन पठाणांपैकी एकजण हाती लागला. त्याला जमावाने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरा मात्र फरार झाला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील निरीक्षक वाय. जी. तरटे यांनी दुसऱ्याला पुण्यात (Pune) जाऊन अटक केली.

मुंबई पोलिसांच्या खास ट्रीटमेंटनंतर दोन्ही मारेकरी पोपटासारखं बोलू लागले. सगळी केस उगाळली गेली. एक एक जण अटक होत गेला. त्यातून युसूफ पटेल आणि मस्तान मिर्झा (Mastan Mirza) यांच्यात झालेला बेबनाव उघड झाला. युसूफला धडा शिकवण्यासाठी मस्ताननं घेतलेली करीम लालाची मदत उघड होत गेली. सारी केस कथानकासारखी उघड झाली.

(या कथेचा संपूर्ण तपशील पुढे येणारच आहे.)

युसूफ पटेल हाजी मस्तानला (Haji Mastan) चांदी पुरवत असे. त्या काळी तस्करी (smuggling) मार्गाने सोनं आणतेवेळी भारंभार चांदी तोलावी लागत असे. म्हणजे जितक्या किंमतीचं सोनं असे तेवढ्याच बाजारमूल्याची चांदी द्यावी लागत असे. ही चांदी युसूफ पुरवत असे. सलग काही वेळा युसूफने पुरविलेल्या चांदीत कथिलाचा, शिशाचा अंश आढळून आला. परिणामी मस्तानची नाचक्की झाली. त्यामुळे त्यानं करीमलाला याला युसूफची सुपारी दिली.

करीमलाला यानं अफगाणिस्तानातून (Afghanistan) दोन पठाण कराची बंदरामार्गे (Karachi Port) मुंबईत उतरविले. त्यांची नावं मिर्झाखान अलिमहंमद आणि सर्फराजखान फरीदखान. मुंबईत त्यांना उतरविल्यावर अब्दुल करीम शेरखान उर्फ करीम लाला यानं त्या दोघांना पाचशे रुपयांचं कापडचोपड खरेदी करून शिंप्याकडून कपडे शिवून घेतले.

युसूफ पटेलच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी अब्दुल अझीझ उर्फ अझीझ होंडा आणि महंमद हुसेन उर्फ माच्छी याची नेमणूक केली होती.

युसूफवर गोळीबार करून पळणारा मिर्झा खान याला युसूफचा अंगरक्षक इसामुद्दीन आणि इतरांनी पाठलाग करून पकडलं . दुसरा सरफराज फरीदखान पसार झाला. पण मुंबईची माहिती नसल्यानं तो शिवडीपर्यंत (Sewri) पळत आला. शिवडी स्टेशनजवळ असणाऱ्या बाॅम्बे पोर्ट ट्रस्टच्या (Bombay Port Trust) इमारतीजवळ येऊन त्यांनं आपलं पिस्तुल जवळच असलेल्या एका गटाराजवळ खड्डा खणून पुरलं आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला (Victoria Terminus – CSMT) जाऊन त्यानं सकाळी डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) पकडून पुणं गाठलं.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात असलेल्या मिर्झा खान यांची मरम्मत केल्यावर मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात जाऊन सर्फराज फरीद खान याला ताब्यात घेऊन परतले. त्यानंतर बरीच धरपकड झाली आणि ही केस पूर्ण झाली.

(पुढील भागात मस्तानचे किस्से)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हे विषयक वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here