@maharashtracity

२०८८ प्राध्यापक तर ३७० प्राचार्य रिक्त पदे भरण्यास मान्यता

मुंबई: उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी बुधवारी दिली.

ही भरती टप्प्याटप्प्याने होणार असून लवकरच निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उच्च शिक्षण विभागांतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी राज्याच्या उच्चस्तरीय सचिव समितीने एकूण ४७३८ पदांना मान्यता दिली होती. यातील १६७४ पदे आजतागायत भरण्यात आली.

कोरोना (corona) संसर्गात गेल्या दिड ते दोन वर्षापासून या भरतीवर निर्बंध घातले होते. आता मात्र भरती प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले. १ ऑक्टोबर २०२० च्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे विभागाने सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. परंतु २०८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्याबाबतचा निर्णय लवकरच निर्गमित करणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बिगर नेट-सेट अध्यापकांना सेवा निवृत्तीचा (pension to non NET- SET lecturer ) लाभ देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. दिनांक २३ ऑक्टोबर १९९२ ते दि. ३ एप्रिल २००० या कालावधीत नेमण्यात आलेल्या बिगर नेट व रोट अध्यापकांची सेवा खंडीत न करता सेवानिवृत्तीपर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांना नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली होती. त्यामुळे नियुक्त बिगर नेट व सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीवेतनाचे लाभ मिळत नव्हता.

मात्र उच्च न्यायालयाने आदेशानुसार या अध्यापकांना मूळ नियुक्तीचा दिवस ग्राह्य धरून तत्कालीन प्रचलित धोरणानुसार जुनी सेवानिवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे सर्वसाधारण ४१३३ अध्यापकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ झाला असल्याचेही सामंत म्हणाले. तसेच सरकारी व अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदांसाठी घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्यात्यांच्या मानधनाच्या दरात सर्वसाधारण २५ टक्के वाढ करण्यात आली.

तर तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेवून नवीन पर्यायी धोरणाबाबत शिफारस करण्यासाठी संचालक, उच्च शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दाखल झाल्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत ८१८८० विद्यार्थ्यांचे लसीकरण :

दिनांक २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत मिशन युवा स्वास्थ (Mission Yuva Swasthya) उपक्रम राबविण्यात आला. यातून उच्च शिक्षण विभागांतर्गत एकूण ८१८८० विद्यार्थ्यांचे लसीकरण (vaccination) करण्यात आले. तसेच तंत्र शिक्षण विभागांतर्गत एकूण २७०३१ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here