@maharashtracity

१ मे रोजी जन्मलेल्या पिल्लाचे नाव ‘ओरिओ’

१९ ऑगस्ट रोजी आणखीन एक पिल्लाचा जन्म

सध्या पेंग्विन कक्षात ३ प्रौढ नर आणि ४ प्रौढ मादी आणि २ पिल्लू

मुंबई: भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात १ मे ते १९ ऑगस्ट दरम्यान दोन नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. यापैकी एक नर जातीचे पिल्लू आहे तर दुसऱ्या पिल्लाचे अद्याप लिंग परीक्षण झालेले नाही. मात्र, ही दोन्ही पिल्ले सुखरूप आहेत. आता पेंग्विन (Penguin) कक्षात यापूर्वीपासून असलेले ३ प्रौढ नर आणि ४ प्रौढ मादी आणि एक नर पिल्लू आणि एक आणखीन पिल्लू असे एकूण ९ पेंग्विन झाले आहेत. (penguin in Veer Mata Jijabai Bhosale udyan)

सध्या या पेंग्विन कक्षात असलेल्या ७ पेंग्विनपैकी डोनाल्ड (Donald) व डेसी (Dessy) या नर मादीच्या जोडीने दिलेल्या एका अंड्यामधून १ मे २०२१ रोजी एक पिल्लू जन्माला आले असून त्याचे नाव ‘ओरिओ’ (नर) (Oreo)असे ठेवण्यात आले आहे. आता त्याचे वय चार महिन्याचे असून तो पालकांबरोबर इतर पेंग्विनसोबत चांगलाच रुळला आहे.

तर मोल्ट व फ्लिपर या नर मादीच्या जोडीनेही दिलेल्या एका अंड्यामधून १९ ऑगस्ट २०२१ रोजी नवजात पिल्लू जन्माला आले असून तो खूपच नवजात असल्याने ते पिल्लू नर की मादी हे अद्याप समजू शकलेले नाही. ते पिल्लू घरट्याबाहेर रुळायला लागेल तेव्हा त्याची तपासणी केली जाईल.

यासंदर्भातील माहिती, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी दिली. याप्रसंगी, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईकरांना बर्फाळ वातावरणात राहणाऱ्या पेंग्विनचे दर्शन कृत्रिम बर्फाळ वातावरणात घडावे या उद्देशाने तत्कालीन युवा सेना नेते व आताचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून व शिवसेना कार्याध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पुढाकाराने राणीच्या बागेत २०१७ ला उत्तर कोरिया (North Korea) येथून ८ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा जंतूसंसर्गामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला.

पेंग्विन कक्ष, ‘ओरिओ’ बाबत अधिक माहिती

डोनाल्ड व डेसी या नर मादीच्या जोडीने १ मे २०२१ रोजी जन्माला घातलेल्या पिल्लाचे ‘ओरिओ’ (नर) वय आता चार महिन्याचे झाले आहे. ‘ओरिओ’चा जन्म झाल्यापासून त्याचे संगोपन त्याच्या पालकांनी चांगल्या प्रकारे केले.

या पेंग्विन कक्षातील सर्व पेंग्विनसाठी आवश्यक बर्फाळ वातावरण ठेवणे, त्यांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणे आदी कामे प्राणी संग्रहालयाच्या डॉक्टर, कर्मचारी यांच्या टीम मार्फत करण्यात येत आहेत.

या ठिकाणी उत्तम जलश्रेणीसाठी प्रगत एलएसएस सुविधा देणे, स्वच्छ हवेच्या अभिसरणासाठी एएचयू यंत्रणा उपलब्ध करणे, २४ तास सीसी कॅमेरामार्फत देखरेख ठेवणे, पेंग्विनची काळजी घेणे, पेंग्विन पिल्लांचे संगोपन करणे, पिल्लांचे वजन तपासणे, त्यांना दैनंदिन आहार देणे आदी कामे पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीपाल आणि अभियंते पाहतात.

‘ओरिओ’ हा चार महिन्यांचा पिल्लू सध्या त्याच्या पालकांसोबत पाण्यात पोहतो. स्वतः स्वतःची काळजी घेत आहे. तो बबल या मादी पेंग्विनसोबत जास्त वेळ घालवत असून इतर पेंग्विनसोबतही तेथील वातावरणात चांगला रुळला आहेत. तो इतर पेंग्विनप्रमाणेच मासे खातो. पुढील आठ महिन्यात तो एक वर्षाचा होईल व इटर प्रौढ पेंग्विनसारखाच दिसू लागणार आहे.

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी मोल्ट व फ्लिपर या नर मादी जोडीनेही एका पिल्लाला जन्म दिला आहे. आता हे पिल्लू २५ दिवसांचे झाले आहे. सध्या त्याचे पालकच त्याचे संगोपन करीत आहेत. मात्र त्यांना आवश्यक व पूरक आहार तज्ज्ञांमार्फत नियमितपणे दिला जात आहे. या पिल्लाची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याने त्याची तीन महिन्यापर्यंत अधिक काळजी घेणे आवश्यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here