@maharashtracity

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईत बीकेसीसह ९ कोविड लसीकरण केंद्र सज्ज

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसह इतर मुलांनाही मोफत लस

ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची सुविधा, नोंदणीला सुरुवात

मुंबई: मुंबईत गेल्या पावणेदोन वर्षांपासून तळ ठोकून बसलेल्या कोविड – १९ (covid-19) या विषाणूपासून बचाव करण्यासाठी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत लसीकरणाचा (free vaccination to children) शुभारंभ ३ जानेवारी रोजी बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्रात (BKC Covid vaccination centre) पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याहस्ते होणार आहे.

मुंबईतील नऊ लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. या केंद्रावर, महापालिकेच्या (BKC) शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना मोफत लस देण्यात येणार आहे.

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, आरोग्य अधिकारी डॉ. गोमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, नववर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्‍यात येणार आहे. या मुलांना ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxin) या लसीचा डोस देण्यात येणार आहे.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे मोफत लसीकरण करण्यासाठी ९ लसीकरण केंद्रांवर पालिकेतर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित मुलांच्या पालकांनी आपापल्या पाल्यांची नोंदणी ऑफलाईन अथवा ऑनलाईन (Offline or online registration) करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईतील ९ लसीकरण केंद्र

ए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळामधील रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र; एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या चार विभागांसाठी शीव (सायन) येथील सोमय्या मैदानावरील जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; एफ/ दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर या तीन विभागांसाठी वरळीतील एनएससीआय डोम जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम या तीन विभागांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र येथे लसीकरण सुविधा असेल.

के/ पश्चिम, पी/ दक्षिण या दोन विभागांसाठी गोरेगाव (पूर्व) मधील नेस्‍को जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; आर/ दक्षिण, पी/ उत्तर या दोन विभागांसाठी मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, आर/ मध्य, आर/ उत्तर विभागांसाठी दहिसर जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, एन, एस विभागांसाठी कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्‍प्‍टन ऍण्ड ग्रीव्‍हस् जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, टी विभागासाठी मुलूंड (पश्चिम) मधील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, अशी ही नऊ केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत.

तसेच, पालिकेनेया व्यतिरिक्त परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय (Dr Babasaheb Ambedkar Railway Hospital) येथे रेल्वे कर्मचार्‍यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीसुद्धा लसीकरण केंद्र उपलब्ध केले आहे.

महत्वाची माहिती

सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र असतील. लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे, अशी सौम्‍य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात. मात्र त्यामुळे मुलांनी व त्यांच्या पालकांनी घाबरुन न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. मात्र आणखीन काही त्रास उद्भवल्‍यास नजीकच्‍या पालिका रुग्‍णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here