By विजय साखळकर

@maharashtracity

वर्धराजन मुदलियार (Varadarajan Mudliar) उर्फ वर्धाभाई मुंबईत आल्याबरोबर नेमकं काय करीत होता याविषयी अनेकांची मते भिन्न् भिन्न आहेत. पण एरियाचा ‘भाई’ ही उपाधी त्याच्या नावापासून मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये (Mumbai Underworld) सुरू झाली. आधी ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे. पण वर्धाभाईच्या आगमनानंतर ‘भाई’ म्हटले जाऊ लागले.

वर्धराजन मुदलियार त्याच्या तामिळनाडूमधील (Tamil Nadu) गावातून मुंबईत दाखल झाला त्यावेळी फक्त पैसा कमवणे आणि पैसाच कमावणे हाच त्याचा उद्देश होता. तो आला त्यावेळी धारावी (Dharavi Slum) ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून लौकिकवान नव्हती. धारावी, कोळीवाडा (Koli wada) आणि इतर काही छोटी छोटी गावे या परिसरात होती.

सायन (Sion) किंवा शिवहून वांद्र्याला (Bandra) जातेवेळी पिवळा बंगला म्हणून एक स्टाॅप लागायचा. त्याच्या आजूबाजूला ‌काही झोपड्या होत्या. सरकारी बंगला पिवळ्या रंगाचा होता म्हणून पिवळा बंगला हे या बस स्टाॅपचं नाव ठेवलं गेलं होतं.

वर्धाने धारावी नावाची मोठ्ठी झोपडपट्टी वसविली, असं मानंलं जात असलं तरी त्याला शासकीय यंत्रणांचा वरदहस्त लाभल्यांनंच ते शक्य झालं असावं. वर्धा धारावीत नेमका कुठे रहायचा हे सांगता येणार नाही. पण धारावीत त्या काळात दाक्षिणात्यांचा (South Indian) भरणा अधिक होता.

वर्धा मुंबईत दाखल झाल्यावर आरंभी काही काळ व्ही. टी. स्टेशन किंवा व्हिक्टोरिया टर्मिनस (Victoria Terminus – VT) येथे हमाली करीत होता असा काही लोकांचा तर्क आहे. तर काहीजण छातीठोक सांगतात की पूर्वी आजचं गुरू तेगबहादूर रेल्वे स्टेशन (GTB Station) आहे त्या‌ परिसरात रेल्वे वाघिणी विसाव्यासाठी थांबवून ठेवल्या जात. त्या वाघिणी लुटण्याचं काम वर्धराजन करीत असे.

त्यासाठी त्याची लहानशी मॅनपाॅवर होती. ती खूप मोठी नव्हती. पण होती. काही लोकांच्या मतानुसार वर्धा काही काळ डाॅक्समध्ये (Dockyard) हमाली करायचा. पण तो नेमकं काय करायचा याविषयी फारशी माहिती पत्रकारांकडे नव्हती.

धारावी हा आज गजबजलेला असला तरी त्या काळात तो निर्जन भाग होता. पोलिसांच्या गस्तीच्या वेळा सोडल्या तर एरवी हा भाग मोकळा असायचा. कशासाठीही….. त्या काळात नारायण ल्युपर्ड नावाच्या बूटलेगरच्या (bootleggers) कारवाया तिथं चालायच्या. इथं दारूच्या भट्ट्या लावायच्या आणि दारू वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची असा त्याचा धंदा होता.

एके दिवशी नारायण ल्युपर्ड मृतावस्थेत आढळला. त्याचा भोसकून खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पण त्याचा खुनी अज्ञातच राहिला. कालांतरानं ही ‘काॅटेज इंडस्ट्री’ वर्धराजन मुदलियारनं आपल्या ताब्यात घेतली. इथून वर्धाभाईची कारकीर्द खऱ्या अर्थांनं सुरू झाली.

मग रसायन फुग्यात, बाटलीत भरणे, डबाबंद करणे यासाठी माणसं लागत आणि ही माणसं वर्धाभाई त्याच्या मूळ गावाजवळून मुंबईत आणायचा. त्यांची राहण्याची व्यवस्था या निर्जंन पट्ट्यात तो‌ करायचा. आज अगणित रासायनिक छोटेमोठे उद्योग असणाऱ्या धारावीतील हा आद्य रासायनिक उद्योग म्हणावा लागेल.

वर्धाकडून जागा मिळते हे लक्षात आल्यावर अनेकांनी आपली नड वर्धाकडून सोडवून घेण्यास सुरुवात केली. वर्धा कुणाला, विशेषत: दक्षिण भारतीयांना नाराज करीत नसे.

त्या काळातच वर्धाची दानशूर अशी प्रतिमा तयार होऊ लागली. कारण वारेमाप येणारा पैसा खर्च कसा करायचा? तर कुणीही गरीब कोणत्याही कारणासाठी आर्थिक मदत मागायला आला तर त्याला तो मदत करत असे. या मदतीची परतफेड वर्धानं कधी हाक मारली तर तिथं उभं राहून करायची हा खाक्या असायचा.

पुढे वर्धाच्या एकूण इंडस्ट्रीच्या अनेक शाखा स्थापन झाल्या व त्या वाढत गेल्या. वर्धाच्या नावासमोर जमीन बळकाव, दारुची (liquor) बेकायदा निर्मिती आणि वाहतूक, खंडणी वसुली (extortion), अपहरण (kidnapping), प्रास्टिट्यूशन रॅकेट (Prostitution racket) अशा विविध सेवांची नोंद होत गेली.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here