@maharashtracity

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेची मंत्र्यांकडे मागणी

धुळे: पदविकाधारक पशुवैद्यकांच्या (veterinary)
अनेक मागण्या प्रलंबित आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी, पशुवैद्यकांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावे, अशी मागणी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांच्याकडे केली आहे. ते जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असताना संघटनेच्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे सल्लागार सचिव डॉ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. हंसराज देवरे, जिल्हा सचिव डॉ. रमण गावित, डॉ. मुकेश माळी, डॉ. मधुकर चौधरी, डॉ. श्याम कवडे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, की पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात (गट ब) तरतूद करावी, राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यकांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यात यावा, बारावी विज्ञाननंतर अडीच वर्षाचा पशुचिकित्सा शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संमतीने तयार केला असून तो लागू करावा.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा (Yashwantrao Chavan Open University – YCOU) बारावी विज्ञाननंतर असलेला अडीच वर्षांचा पशुचिकित्सा शास्त्राचा पदविका अभ्यासक्रमाचा शासन निर्णय पुनर्जीवित करावा, पशुधन विकास अधिकारी (गट ब) पदांचा स्थान निश्‍चितीचा शासन निर्णय पुनर्जीवित करावा, सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांना पशुधन विस्तार अधिकारी गट ब च्या पदोन्नत्या देण्यात याव्या, कायम प्रवास भत्ता (Travel Allowance – TA) मंजूर करावा, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 2 जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात येऊ नये, अशाही मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.

पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्त पदाची नियमित सेवा भरती करावी, आऊटसोर्सिंगद्वारे कंत्राटी पध्दतीची भरती बंद करावी, भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 कलम 30 ब अंतर्गत राज्य सुधारणा विधेयकाद्वारे पदविकाधारक पशुवैद्यक व्यावसायिक संरक्षण देणे व व्यवसाय नोंदणी करण्याची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here