By विजय साखळकर

@maharashtracity

मुंबई: अंडरवर्ल्डचा पहिला डाॅन म्हणून अलीकडच्या काळातील पत्रकार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांची नावे घेत असतात. कधी करीम लाला तर कधी हाजी मस्तान. करीम लाला हा पहिला डाॅन असं अलीकडच्या काळात गुन्हेगारीवर लिहिणारे पत्रकार मानतात. त्यांना करीम लाला उर्फ अब्दुल करीम शेरखान या सामान्य माणसाला या पदावर विराजमान करणा -या अयुब लाला या पहिल्या डाॅनची कथा माहीत नाही. त्यानं एका रात्रीत करीम लाला याला मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्याचा बादशहा बनविले.

अयुब लाला हा पख्तुन भागातून मुंबईत आला. त्या काळात गुन्हेगारी विश्वाच्या चाव्या पठाणांच्या हाती होत्या. मुंबईत त्या काळात एकूण १४००० पठाण होते. त्यांचा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे पैसे कर्जाऊ देणे. त्या कर्जाचं व्याज आणि परतफेडीचे त्यांचे नियम पाशवी होते. पठाण ब्रॅंच ही मुंबई पोलिसांची शाखा त्या काळात अस्तित्वात होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात असलेल्या पठाणांची नोंदणी झाली होती. नव्यानं आलेल्या पठाणांचीही नोंद होत असे आणि त्यासाठी पख्तून ए जिरगा या संस्थेची शिफारस महत्त्वाची मानली जाई. या संस्थेचा सर्वेसर्वा होता अयुबलाला. साहजिकच मुंबईतील १४००० पठाणांचे सामर्थ्य त्याच्या मागे होते.

पठाणांच्या पैसे कर्जाऊ देण्याच्या धंद्याबरोबरच त्यांचे गुन्हेगारीशी संबंधित व्यवसाय असत. उदाहरणार्थ मारण्याची सुपारी घेणे, खूनाखुनी करणे, जमिन बळकाणे आदी आदी. अयुबलाला या सा-या पठाणांचा म्होरक्या असल्याने राज्य त्याचं चालत असे. स्वत: अयुब हा सोशल क्लबचा फायनान्सर होता. सोशल क्लब ही बाब पैसे कमावण्याची खाण होती.

मुंबईतील सोशल क्लब्सना फायनान्स पुरविण्यात अयुब लाला अग्रेसर होता. बदल्यात त्याला दर महिना काही ठराविक रक्कम क्लबकडून मिळत असे. अयुबने केलेली आरंभीची गुंतवणूक, क्लबची लोकॅलिटी आणि एकूण उलाढाल यावर अवलंबून असे. त्यामुळे अयुब लालाच्या घरात त्या काळात कित्येक लाखाची माया जमा होत असे. त्यावर अयुब लालाची गॅंग चालत असे.

अयुब लाला तब्येतीनं दणकट होता. शिवाय पठाण. साहजिकच भरपूर उंची. त्यामुळे त्याची प्रचंड जरब असे. वर्षभर कमावलेला पैसा गाठीला बांधून अयुब लाला गावी जाऊन यायचा. त्याची मुंबईत प्रचंड दहशत. पोलीस त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करीत नसत. शिवाय हाती येणारा पैसा तो सामान्य जनता आणि सरकारी यंत्रणा यांच्यावर उधळत असे. त्याची एकूण प्रकृती आणि दिलदारी यामुळे त्याच्या विरोधात तक्रारही दाखल होत नसे.

असाच एकदा गावी जाऊन परत येत असताना त्याला एक खेळणं मिळालं. त्या काळात मुंबईत येण्यासाठी पठाण अफगाणिस्तानातून श्रीनगरपर्यंत येत. तेथून बसने दिल्लीत व नंतर रेल्वेने मुंबई असा प्रवास करावा लागत असे. अयुब लाला आपल्या पै पाहुण्यांसह श्रीनगरला आला होता व तेथे बस डेपोत असताना त्याला एक अडीच-तीन वर्षाचं पोरगं एकटंच रडताना दिसलं. त्यानं त्याची चौकशी केली. पण त्याला अम्मा, रोटी, मटन, घर या शब्दांशिवाय फारसं बोलताच येत नव्हतं. त्याला भूक लागली असेल असं समजून अयुबनं त्याला खाऊ पिऊ घातलं. साहजिकच तो अयुबला चिकटला.

अयुबनं त्याची आजूबाजूला चौकशी केली. त्याचा आगापिछा काढण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. अखेर अयुब ने त्याला आपल्याबरोबर मुंबईत आणण्याचं ठरवलं.

मुंबईत आणल्यावर या पोराचं नामकरण केलं गेलं. नाव सैद किवा सईद सांगितलं म्हणून सईद आणि काश्मीरात सापडला म्हणून आडनाव काश्मीरी ठेवून त्याचं लालन पोषण करायला अयुब लालानं सुरूवात केली.

अयुब लालांच्या मुलांसोबत तो वाढत होता. त्यांच्या घरचं सामीष भोजन आणि त्यासोबत जातायेता बदाम-काजुचे बकाणे यामुळे सईद काश्मीरी चांगला टुणटुणीत दिसू लागला. तो सतत अयुबलालाच्या जवळपास वावरत असे.
सईद काश्मीरी याला आपल्या धंद्यात रस आहे, असा अर्थ अयुब लालाने काढला. त्यामुळे अयुबलालानेही त्याला अधिकाधिक वाव दिला.

वयानं अठरा वर्षाचा झाला तेव्हा सईद काश्मिरी हा अगदी पंचविशीचा दिसू लागला. इथून अयुब लालाच्या साम्राज्याला घरघर लागली.

सईद काश्मीरीची हत्या

सईद काश्मीरी पारंपारिक पठाणी वेषात फिरायचा. त्याची तब्येत, उंची पाहून भले भले टरकायचे. त्यातून तो अयुब लालाचा दत्तक मुलगा. त्यामुळे जिकडे जाई तिकडे त्याची चांगली सरबराई होत असे. याचा सईद काश्मीरीला कैफ चढला होता.

सोशल क्लबचं रॅकेट अयुब लाला चालवायचा. कोणत्याही क्लबमध्ये त्यामुळे सईद काश्मीरीची चांगली उठाबस व्हायची. जाताना तो शे-दीडशे मागायचा तेही मिळायचे. इथपर्यंत सारं ठीक होतं. पण यातूनच सईदची भूक वाढत गेली. तो क्लबवाल्यांकडून हजारो रुपये उकळू लागला. जो नकार देई त्याच्या धंद्यावर नासधूस करू लागला. त्यामुळे क्लबचालकांचं नुकसान होऊ लागलं. कारण अयुब लाला याला पैसे देणं भागच होतं. कारण व्यवसायासाठी इनिशियल अमाउंट त्याचंच असायचं. त्यामुळे तो त्यांच्यात अलिखित करार होता.

काही काळापर्यंत क्लबचालकांनी सईद काश्मीरीच्या या उपद्व्यापांकडे दुर्लक्ष केले. पण त्याचा परिणाम असा झाला की सईदची भूक वाढत गेली. सईद अधिकाधिक पैसे उकळू लागला. परिणामी अयुब लाला हिशोब कमी येत असल्याबद्दल क्लबचालकांना विचारू लागला.

अखेर काही क्लबचालकांनी धीर करून अयुब लालाकडे तक्रार केली की सईद पैसा मागतो, बळजबरीने आणि तुम्हालाही द्यावा लागतो. दोन दोनदा कसा पैसा देणार?

अयुब लालानी हा विषय जाणून घेतला आणि नंतर सईदचं बौद्धीक घेतलं. हा सगळा पैसा आपलाच आहे. घरी आल्यावर तू हवा तेवढा घे त्यातला….हिशेबात गोंधळ नको.

पण सईदनं अयुब लालाची ही विनंती गांभीर्याने घेतली नाही. तीन-चार वेळा समजावून सांगितल्यावरही सईद त्याला वाटेल तेच करू लागला. अखेर सईदची कर्तबगारी थांबवण्यासाठी पुत्रप्रेमावर निखारा ठेवण्याचा इरादा पक्का केला. सईदची सुपारी काढली. फक्त पंचवीस हजार. पण ती उचलण्यास कुणी पुढे येत नव्हतं. काय कारण असेल?

प्रत्येक सुपारीबाज सुपारी उचलण्याआधी एक गणित करतो. त्यानुसार कोणत्याही सुपारीबाजाला अयुब लालाचे आमिष सुरक्षित वाटत नव्हते. कारण सईद हा अयुब लालाचा लाडका होता. रागाच्या भरात त्यानं सुपारी फोडली असू शकते. कुणी ती वाजवली तर शब्दाप्रमाणे त्याला २५००० रुपये दिलेही जातील. पण नंतर कधी अयुब लालाचा राग निवळला. आपल्या दत्तक मुलाविषयी पुन्हा प्रेमाचा पाझर फुटला तर कदाचित सुपारी वाजवण्याची चूक करणा-याची खटिया खडी होऊ शकते. म्हणून या सुपारीला कुणी हातच घालत नव्हतं.

अखेर एकानं तयारी दाखवली. मग त्याला सुपारीची रक्कम आगाऊ पुरविण्यात आली. सईदचं वजन २०० किलो होतं. त्यामुळे मारेक-याला २०० किलो वजनाचा पुतळा समोर आणून त्यांच्याकडून तज्ञ ‘ वार’ क-याकडून प्रशिक्षण पुरविण्यात आलं. वार वेगवेगळ्या दिशांनी केला गेल आणि त्या दिशेनं सईदचा जख्मी देह अंगावर आला तर ते टाळायचं कसं याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

त्यानंतर त्याला सईदच्या मागावर सोडण्यात आलं..एके दिवशी सकाळी नेहमीसारखा सईद नेहमीसारखा पैसे गोळा करायला निघाला. एका सोशल क्लबमध्ये जिना चढून जात असताना मागून आलेल्या सरदारजीच्या वेषातील मारेक-यानं त्याच्या मानेवर संपूर्ण ताकद एकवटून वार केला. सईदचं शीर धडावेगळं झालं आणि जिन्यावरून गडगडत खाली असणा-या पानगादीवाल्याजवळ आलं. पायाजवळ काय आलंय गडगडत हे पाहिल्यावर त्याची बोलती बंद झाली. पानगादी तशीच टाकून तो पसार झाला. तो परत आलाच नाही. मारेकरीही पसार झाला.

सईद नावाचं वादळ संपलं. पण त्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक वेगळं वळण आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here