By विजय साखळकर

@maharashtracity

मन्या सुर्वेच्या (Manya Surve) चकमकीपासून (encounter) मुंबईतील (Mumbai) जनतेत भूमिगत जगाविषयी (Underworld) उत्कंठा निर्माण झाली आणि ती शमविण्यासाठी पत्रकारांमध्ये स्पर्धा लागली.

मन्या सुर्वे १९८२ मध्ये चकमकीत मारला गेला. त्यावेळी मुंबईच्या आयुक्तपदी सुपरकाॅप (Supercop) ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) होते. गुन्हे विभागाचे प्रमुख रणबीर लेखा होते आणिअत्यंत लौकिकवान असा एक निरीक्षक होता….सिमरांजित सिंग मान. पुढे हा अधिकारी फरार झाला आणि खलिस्तानी चळवळीतील (Khalistan movement) एका गटाचा नेता बनला. नंतर खासदारही (MP) झाला.

मुंबई अंडरवर्ल्डचा मन्या हा सर्वात लकी घटक. तो अत्यंत टेरर होता.अंडरवर्ल्डची पाठशाळा किंवा अंडरवर्ल्डचं टेक्स्टबुक म्हणजे मन्या सुर्वे. मन्या सुर्वेनं आपल्या छोट्याशा कारकिर्दीत जे घडवलं तो अंडरवर्ल्डचा कित्ता होता आणि नंतर तोच ही बाकी मंडळी गिरवत होती.

या सर्व झकाझकीत ‘डाॅन’ (Don) हा शब्द कुठून आला आणि रूढ झाला. डाॅन म्हणजे नेमकं काय?

अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई अंडरवर्ल्डवर लिहू लागलेल्या पत्रकारांनी कुणालाही अंडरवर्ल्ड डाॅन असे संबोधण्यास सुरुवात केली.आजपर्यंत अंडरवर्ल्ड डाॅन म्हणून करीम लाला (Kareem Lala), हाजी मस्तान (Haji Mastan), अरुण गवळी (Arun Gawali) ,दाऊद (Dawood Ibrahim), छोटा राजन (Chhota Rajan) यांना सर्रास डाॅन म्हटलं आहे. पण डाॅन कोण असतो?

मारियो पुझो (Mario Puzo) यानं ‘गाॅडफादर’ (Godfather) म्हणून एक कादंबरी लिहिली होती. सिसिलियन माफीया आणि त्यांच्या फॅमिलीजवर आधारित या कादंब-यातून माफिआसो, माफीया सरदार, फॅमिली असे शब्द आले आणि ते आपण आपल्या लेखनात उचलले.

मी गाॅडफादरचा मराठी अनुवाद १९७४-७५ साली वाचला होता. धर्मपिता असाही उल्लेख अधूनमधून होत होता. त्यात ही साखळी दाखवली आहे. आता पूर्णसं आठवत नाही. पण गाॅडफादरच्या दिमतीला डाॅन असे. या डाॅनच्या हाताखाली चार माणसे असतात. त्यांना त्यांचे विभाग वाटून दिलेले असतात. त्या त्या विभागातील अहवाल रोजच्या रोज डाॅनला दिला जात असे. डाॅन तो धर्मपित्याकडे पोहोचवत असे. या तपशिलानुसार डाॅनची अंडरवर्ल्डमधील भूमिका नेमकी काय याचा अंदाज येईल.

तरीही एक उदाहरण……किन-या आवाजाच्या एका व्यक्तीला पार्श्वगायनाची संधी हवी होती. गाॅडफादर गळ घालतो. पण प्रोड्युसर त्याचा किनरा आवाज आहे, असं सांगून नाकारतो. त्याच रात्री त्याच्या बेडरूममधील बिछान्यावर त्याच्या आवडत्या घोड्याचं मुडकं मिळतं. त्या गायकाला काम मिळतं. डाॅन इतका थंड डोक्याचा आणि क्रूर असतो. त्याची पोच प्रचंड असते.

जुन्या इंग्रजी नियतकालिकांतून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाॅन केनेडी (John Kennedy – JFK) यांनी माफिया मित्राच्या मदतीने जिंकल्याचे उल्लेख मिळतात तर‌ एस्कोबार व जाॅन कनेडींचा फोटो प्रकाशित झाला होता.

सुदैवानं एवढी राजकारणावर भक्कम आणि देशव्यापी पकड भारतातील डाॅन निर्माण करू शकले नाहीत. त्यांची धाव फक्त शहरापुरती, एखाद्या जिल्ह्यापुरती किंवा प्रांतापुरती असते.

ही सर्व माहिती एवढ्याच कारणासाठी दिली की डाॅन म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते प्रत्यक्ष त्या संज्ञेपासून खूप दूर असतात. ते फक्त त्यांच्या टोळीचे प्रमुख असतात. म्हणजे फॅमिली चीफ….

डाॅन म्हणता आणि मानता येईल असा भारतात एकच इसम झाला….तो म्हणजे अयुब लाला (Ayub Lala).

(विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून गुन्हेगारी क्षेत्राचे वार्तांकन करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here