स्थायी समितीपुढे तिसऱ्यांदा प्रस्तावमंजुरीसाठी सादर 

देवनार डंपिंगवर लोडर, डंपर भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्ताव

३ फेब्रुवारी रोजी प्रस्ताव राखून ठेवला 

८ फेब्रुवारीला प्रस्ताव दप्तरी दाखल 

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) देवनार डंपिंग ग्राउंडवर (Deonar Dumping ground) कचरा स्थानांतरीत करणे, नालेसफाई करणे आदी कामांसाठी उपयुक्त ठरणारे एक्सकॅव्हेटर कम लोडर (२,१९० पाळ्या) आणि ओपन डंपर (३,२८५ पाळ्या) कंत्राटदाराकडून भाडयाने घेण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला आहे. 

या आधी स्थायी समितीने (standing committee) हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात प्रथमतः राखून ठेवला व दुसऱ्या बैठकीत प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासन खूपच आग्रही झाले असून स्थायी समिती या वादग्रस्त ठरलेल्या प्रस्तावाला मंजूर करणार की पुन्हा दप्तरी दाखल करणार याचा निर्णय बुधवारी होऊ घातलेल्या बैठकीत होणार आहे.    

न्यायालयाने कचऱ्याचा मानव निर्मित डोंगर बनलेल्या देवनार डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा आणि पुढील काळात डंपिंग ग्राउंडचा वापर कचरा टाकण्यासाठी करू नका, असे सक्त आदेश पालिकेला दिले आहेत. 

मुंबईतील डंपिंग ग्राउंड बंद करून मुंबईतील कचरा मुंबईबाहेर डंपिंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी कचरा टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या देवनार डंपिंग ग्राउंडवर दररोज ६०० – ६५० मे.टन इतका कचरा टाकण्यात येत आहे. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा स्थानांतरित करणे, डंपिंग ग्राउंड परिसरातील नाल्यांची सफाई करणे आदी कामांसाठी उपयुक्त ठरणारे २ एक्सकॅव्हेटर कम लोडर (२,१९० पाळ्या, प्रति पाळी २,२२४.८० रुपये याप्रमाणे) आणि ३ ओपन डंपर (३,२८५ पाळ्या, प्रति पाळी १,६२२.४४ रुपये याप्रमाणे)  मे.सनरेज एंटरप्रायजेस या कंत्राटदाराकडून भाडयाने घेणे व त्यासाठी कंत्राटदाराला १ कोटी ६ लाख रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. 

मात्र प्रस्तावात माहिती अपूर्ण असल्याचे आणि अगोदरच्या कंत्राटकामाची मुदत संपण्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती, आदी कारणे देत, स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ८ फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला असता प्रशासकीय माहितीवर असमाधान व्यक्त करीत स्थायी समितीने प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.    

मात्र पालिका प्रशासनाने, देवनार डंपिंगवरील कचऱ्याचे स्थानांतरण करणे, डंपिंग परिसरातील नाल्यांची सफाई करणे, डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी एक्सकॅव्हेटर कम लोडर व डंपर यांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here