Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय निवासी डॉक्टर डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात घडला असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हुशार असलेल्या विद्यार्थी डॉक्टरने आत्महत्या का केली? असा सवाल सहकारी डॉक्टरांना पडला असून पुढील तपास सुरु असल्याचे मुंबई मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींनीनी सांगितले.

डॉ. पाटील याचे वय २७ असून हा जळगाव जिल्ह्यातून शिक्षणासाठी मुंबईत आला होता. केईएम रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. केईएम रुग्णालयात जागा नसल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच मेडिसीन हा विभाग शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे. याच विभागात डॉ. आदिनाथ प्रशिक्षण घेत होता. रुग्णालय सूत्रांच्या म्हणण्यानुसार केईएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे तसेच केईएममध्ये जागा नसल्यामुळे हा विभाग शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे. या विरोधात डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांनी पूर्वी म्हणणे मांडले होते. या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्यामुळे अनेकांना त्याचा मनस्ताप होत असल्याचे अनेकांनी यापूर्वी देखील म्हटले होते.

आदिनाथ सोमवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्याच्या खोलीत सहकाऱ्यांना आढळून आला. मात्र त्याच्या बाजूलाच इंजेक्शनचे रिकामे सिरीज आढळून आले. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. या घटनेची माहिती रफि अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळातून इंजेक्शन सिरीज ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून आदिनाथच्या कुटुंबाला कळविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावर बोलताना मुंबई मार्डचे प्रतिनिधी डॉ. वर्धमान रोठे यांनी सांगितले की, मेडिसिन विषयाच्या पहिल्या वर्षातील ज्युनिअर डॉ. आदिनाथ पाटील याने रात्री आत्महत्या केली. या मागील कारण माहित पडले नसून ते कारण जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. तो अतिशय हुशार विद्यार्थी डॉक्टर होता, तपास सुरु असल्याचे डॉ. वर्धमान रोठे म्हणाले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here