Twitter : @vivekbhavsar

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आले असताना काँग्रेस पक्षाला अखेर विधानसभेतील विरोधी पक्ष नेता मिळाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे राज्यातील विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आज विधिमंडळ प्रशासनाकडे विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करावी अशी विनंती करणारे पत्र सादर करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या 28 आमदारांनी संग्राम थोपटे यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करावी अशी मागणी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली होती, तसे पत्रही दिले होते, मात्र, या आमदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून अजित पवार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने काँग्रेसच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद चालून आले आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होऊन तीन आठवडे होण्यात आले तरी कॉंग्रेस ला विरोधी पक्षेनेता कोण असावा याचा निर्णय घेत आला नव्हता. अधिवेशन संपण्यास आता अवघे तीन दिवस राहिले असताना अखेर आज विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले.

वडेट्टीवार यांनी सन 2019 मध्ये काही महीने विरोधी पक्ष नेतेपद भूषवले आहे. तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 जून 2019 रोजी पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर विजय वडेट्टीवार यांची 24 जून 2019 रोजी विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली होती. वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नवे विरोधी पक्षनेते हे दोघही विदर्भातील असल्याने पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील काही नेते नाराज असल्याची चर्चा खाजगीत केली जात आहे. वडेट्टीवार हेच विरोधी पक्ष नेते असतील अशी शक्यता वाढली तेव्हाच काँग्रेसच्या 28 आमदारांनी लेखी पत्र देवून संग्राम थोपटे यांची विरोधी पक्षे नेते म्हणून निवड करावी, अशी मागणी केली होती. वडेट्टीवार यांची निवड केली तर आम्ही विधानसभेत वेगळा गट स्थापन करू, असा इशारा त्यांनी या पत्राद्वारे दिला होता, असा दावा एका आमदाराने केला.

या पत्र मोहिमेत सहभागी असलेल्या एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की संग्राम थोपटे यांची निवड झाली तर आम्हाला आनंद होईल असे पत्र आम्ही लिहिले होते. मात्र याचा अर्थ यांचा वडेट्टीवार यांच्या नावाला विरोध होता असा होत नाही. दुसऱ्या आमदाराने सांगितले की वेगळा गट करणे शक्य नाही, पण थोपटे व्हावेत ही जवळपास सगळ्याच आमदारांची इच्छा होती. मात्र, पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो आम्हाला मान्य आहे, अशी पुष्टी या आमदाराने जोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here