Twitter : @milindmane70
महाड
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांमध्ये एकुण १३४ ग्रामपंचायती असून मागील दोन वर्षापासून तालुक्यातील २८ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. त्याच प्रमाणे विस्तार अधिकार्यांची तीन पैकी एक पद रिक्त आहे. अन्य विभागांमध्ये देखिल काही पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागांतील प्रशासकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र महाड पंचायत समितीमध्ये पाहण्यात मिळत आहे.
तालुक्यातील महसुली गावांची संख्या 188 आहे. महाड तालुक्यात नऊ मंडळ असून तलाठी सजाची संख्या 51 आहे. ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्यामुळे एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार गावांचा पदभार सोपविण्यांत आला आहे. चार – चार पंचायतीमध्ये काम करीत असल्याने नागरिकांना ग्रामसेवकाची भेट मिळत नाही. त्यातच ग्रामसेवक हे एखाद्या ग्रामपंचायतमध्ये नियुक्त असताना त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना आपला मोबाईल नंबर एक देतात, तर दुसऱ्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना दुसरा मोबाईल नंबर देतात. प्रत्यक्षात मात्र दोन्ही नंबर बंद करून आपला कार्यभार हाकण्याचे काम ग्रामसेवक करीत असल्याने ग्रामपंचायत पातळीवरील नागरिकांची कामे महिने न महिने रखडत असल्याचे चित्र महाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.
ग्रामसेवकाकडून जन्म मृत्यु दाखला, रहिवासी दाखला, बांधकामाचे परवाने त्याच बरोबर कर वसुली, गावातील स्वच्छता,दिवाबत्ती इत्यादी महत्वाची कामे केली जातात. गाव पातळीवर मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवकाकडे देण्यांत आलेले आहे. परंतु २८ ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.